उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रात दिवाळीनंतर थंडीची चाहूल लागते. मात्र महाराष्ट्रात हवामानाचे स्वरुप बदलत आहे. त्यामुळे यंदा कपाटात मागे सारलेले लोकरी कपडे लवकर बाहेर काढण्याची संधी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरकरांना चालून आली आहे. राज्यातील अनेक भागात किमान तापणान 15 अंश सेल्सिअसच्या आसपास घसरण झाली आहे. येत्या काही दिवसांमध्ये पारा आणखी घसरणार असल्याची इशारा हवामान विभागाने दिला आहे.
मुंबईशिवाय पुणे, कल्याण, ठाणे या पट्ट्यातही दोन दिवसांपासून तापमान खाली आलं आहे. राज्यातील इतर भागातही थंडीचं वातावरण अनुभवायला मिळत आहे.हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात गुरुवारी २५.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची, तर सांताक्रुझ केंद्रात २२.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.मुंबईमधून मोसमी पाऊस माघारी गेल्यानंतर नागरिकांना सतत उकाडा सहन करावा लागत होता. तसेच कमाल तापमानातही सरासरीपेक्षा वाढ झाली होती. मात्र आता दोन दिवसांपासून तापमान खाली आल्याने थंडीची चाहूल लागली आहे.
पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पहाटेच्या वेळी गुलाबी थंडी पडताना दिसत आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात देखील तापमानाचा पारा नीचांकीवर आला आहे.त्याचबरोबर राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये सरासरी तापमानात मोठी घट होत असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. तर महाराष्ट्राच्या काही भागात उत्तर भारतातील थंड भागातून ईशान्येचे वारे येणार आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी तापमानात घट होईल. सध्या राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण असले तरी आर्द्रतेचं प्रमाण आणखी कमी होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यानंतर पुढील आठवड्यापासून थंडीचा कडाका वाढणार आहे.
