उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नियोजित बारामती दौरा अखेर रद्द

राज्यात आरक्षणासाठी मराठा आंदोलक आक्रमक झाले असून बारामती येथे होणारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगामाचा शुभारंभ कार्यक्रम अखेर रद्द करण्यात आला आहे. बारामती येथे होणाऱ्या.कार्यक्रमाला केवळ अजित पवार हेच नाही तर सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे आज माळेगाव कारखाना परिसरात सर्व मराठा आंदोलक एकवटले आहेत. त्यामुळे अजित पवार यांचा नियोजित दौरा रद्द.करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.

जरांगे पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है… एक मराठा लाख मराठा.. आरक्षणाच्या आमच्या हक्काचे. नाही कुणाच्या बापाच.. एक मिशन मराठा आरक्षण.. या मजकुराचे फलक घेऊन मराठा आंदोलक आंदोलन स्थळी जोरदार घोषणाबाजी करत आहे. कारखाना परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार कारखान्याच्या गळीत हंगामाच्या कार्यक्रमाला येणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र कार्यक्रमास्थळी मराठा समाजाकडून आंदोलन होत असल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार हे कारखान्यातील कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर येत आहे.