‘साहेब शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळाले, आता दिवाळी साजरी करा’; धनंजय मुंडेंना शेतकऱ्याची साद

दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळं महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत आहेत. या शेतकऱ्यांना दीवाळीपूर्वी पीक विम्याची मदत मिळवून दिली नाही, तर मी सुद्धा दिवाळी साजरी करणार नाही,अशी प्रतिज्ञा कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केली होती. मात्र, त्यानंतर आता शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळत आहेत. याच पार्श्वभूमवर एका शेतकऱ्यानं मंत्री मुंडेंना भावनिक पत्र लिहलं आहे. ‘साहेब पीक विम्याचे पैसे मिळाले आहेत, आता दिवाळी साजरी करा’ अशी भावनिक साद शेतकऱ्याने घातली आहे. या शेतकऱ्याने दिवाळीची भेट वस्तू देऊन भावनिक पत्र लिहले आहे.

यावर्षी राज्य सरकारनं एका रुपयात पीक विमा देण्याची घोषणा करुन त्याची यशस्वी अंमलबजावणी केली. मात्र पावसाने 21 दिवसापेक्षा जास्त खंड दिल्यामुळं या पिक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकरी पात्र ठरले आहेत. मात्र, अनेक पिक विमा कंपन्यांनी तांत्रिक मुद्दे उपस्थित करत विम्याबाबत चाल ढकल, अपील केले. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून दिल्याशिवाय मी सुद्धा दिवाळी साजरी करणार नाही, अशी घोषणा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केली होती. याबाबतची सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होऊपर्यंत सार्वजनिक सभा आणि समारंभात कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी पुष्पगुच्छ, हार सुद्धा स्वीकारले नाहीत.दरम्यान 26 ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांना नमो किसान सन्मान योजनेचा 2000 रुपयांचा हप्ता थेट खात्यात वर्ग करण्यात आला. तसेच 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान पिक विमा योजनेचा लाभ देण्याचे मान्य करून रक्कम खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या माध्यमातून राज्यातील 35 लाख शेतकऱ्यांना 1700 कोटी रुपये वर्ग होणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना ऐन सणा-सुदीच्या दिवसात थोडासा आधार मिळाला असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.

शेतकऱ्याने पत्रात नेमकं काय म्हटलं?-

गोविंद देशमुख नामक एका प्रगतशील शेतकऱ्यांने कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “यावर्षी कुठे अतिवृष्टी झाली तर कुठे दुष्काळामुळे शेतकरी होरपळला. परंतु राज्याच्या कृषीमंत्रीपदावर आपण विराजमान असल्याने प्रत्येक शेतकऱ्याला एक आशेचा किरण दिसला. तुम्ही म्हणालात की, प्रधानमंत्री पीकवीमा योजनेचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाहीत, तर मी सुद्धा दिवाळी साजरी करणार नाही. तेंव्हाच आम्हाला वाटले की आमच्या घरातीलच कोणी कृषीमंत्रीपदावर विराजमान आहे. आपण शब्द पाळला, खरा करून दाखवला!…राज्यातील 35 लाख शेतकऱ्यांना १७०० कोटी रुपये वितरीत झाले. खुप खुप अभिनंदन…आपल्या बीड जिल्ह्यात ७ लाख शेतकऱ्यांना २४१ कोटी रुपये मिळणार आहेत त्याबद्‌दल्ही आपले हार्दीक अभिनंदन…आम्हाला खात्री आहे की, आपल्या पदाचा आपण असाच फायदा गोरगरीबांना मिळवून द्याल.”