नवाब मलिक यांच्यावरचे ‘हे’ आरोप संजय राऊतांना वाटत नाहीत भयंकर!

उध्दव ठाकरे गटाचे खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी नवाब मलिक यांच्यापेक्षा भयंकर अपराधाचे आरोपी मंत्रीमंडळात असल्याचा आरोप केला आहे. अंडरवर्ल्डशी कनेक्शन असलेले, मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न करणारे त्यांच्याशी जमीनींचे सौदे करणाऱ्या मलिकांचे अपराध त्यांना भयंकर वाटत नाहीत.

राष्ट्रवादी काँग्रेसचेआमदार नवाब मलिक यांच्यावरील यांच्याबाबत शरद पवार गट आणि उध्दव ठाकरे गटाला उमाळा आला आहे. इतर नेत्यांवरील भ्रष्टाचाराच्या आराेपांशी तुलना केली जात आहे. भ्रष्टाचार वाईटच पण मलिकांचे थेट देशाच्या शत्रुंशीच संबध असल्याचा आरोप आहे. त्याच्यापेक्षा कोणता भयंकर आरोप भारतीय नागरिकावर होऊ शकतो.

मलिक यांचे मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी आरोपींशी संबंध होते याचे अनेक पुरावे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सादर केलेले आहे. हे आरोपी आणि मलिक यांच्यात अनेक मालमत्तेचे सौदे झाले. 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपी सरदार शाहवली खान आणि हसीना पारकर यांचा जवळचा व्यक्ती सलीम पटेल याचे नवाब मलिकांशी व्यवसायिक संबंध आहेत. नवाब मलिक यांच्या नातेवाईकांच्या कंपनीला त्या दोघांनी करोडोची जमीन कवडीमोल भावाने विकली. या सरदार शाह वली खानवर १९९३ च्या बॉम्बस्फोटाचा आरोप आहे. तो सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. टायगर मेमनच्या सांगण्यावरून बीएमसी इमारत आणि इतर ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

दाऊद नंतर त्याची बहिण हसीना पारकर प्रॉपर्टी खरेदी करत होती. त्यामधे पावर ऑफ अटॉर्नी सलीम पटेलला लावत होती. तीच प्रॉपर्टी नवाब मलिक यांच्या नातेवाईकांनी खरेदी केली. या प्रकरणी ईडीने त्यांच्यावर कारवाई केली होती. साडेतीन एकर जमीन अक्षरश: कवडीमोल भावाने म्हणजे 20 ते 30 लाख रुपयांत देण्यात आली होती.

मोहम्मद सलीम पटेल हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा माणूस. दाऊदची बहीण हसिना पारकर हिचा बॉडीगार्ड आणि ड्रायव्हरही. हसीनाला अटक झाली तेव्हा पटेललाही मुंबई पोलिसांनी पकडले होते. अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा मेहुणा असलेला सलीम पटेल हा सलीम फ्रूट नावाने ओळखला जातो. त्याने ईडीच्या चौकशीत इक्बाल कासकरचे नाव घेतले होते. इक्बाल कासकरने चौकशीत नवाब मलिकांचे नाव घेतले होते. त्यानंतर ईडीने दीर्घ चौकशीनंतर नवाब मलिकांना अटक झाली होती.

टाडा अंतर्गत खटला चालवला जात असलेल्या आरोपींच्या जमिनी सरकार ताब्यात घेते, असा कायदा त्यावेळी होता. ही जमीन सरकारी ताब्यात जाण्यापासून वाचवण्यासाठी नवाब मलिक यांनी खरेदी केली होती का? असा प्रश्न यामुळे उपस्थित होतो.