मराठा समाजाला पूर्वी दिलेलं 16 टक्के आरक्षण 10 टक्क्यांवरती कसे आले याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. सर्वात आधी मराठा समाजाला पृथ्वीराज चव्हाण सरकारने 16 टक्के आरक्षण दिलं होतं. ते न्यायालयाने नाकारलं. मग मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण दिलं. ते न्यायालयाने शिक्षणात 12 टक्के आणि नोकरीत 13 टक्क्यांवर आणलं. पण आता राज्य मागास आयोगाने जे निकष दिले, त्या निकषाने पाहणी केली, त्या पाहणीतून त्यांनी ज्याप्रकारचा निकाल दिला. त्यानुसार आजचं विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. शेवटी आपल्याला आरक्षणाची टक्केवारी ठरवताना ती खबरदारी घ्यावी लागते, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
कदा कायदा पास झाला की आता सरकारी नोकरीच्या जेवढ्या जाहिराती निघतील त्यामध्ये मराठा समाजाचं आरक्षण असेल. उद्धव ठाकरे यांचा आमच्यावर विश्वास आहे ही खूप चांगली गोष्ट आहे. त्यांचा विश्वास योग्य आहे ते आम्ही दाखवून देऊ, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. मला असं वाटतं की, आता हे विधेयक पास झाल्यानंतर सर्व नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळणार आहे. उद्धव ठाकरे यांच्यासमोरच विधेयक पास झालं आहे. त्यांना असा प्रश्न पडण्याचं काही कारणच नाही. पण मला हे माहिती आहे की, त्यांचा आमच्यावरच विश्वास आहे. त्यांना माहिती आहे की, मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात सवलात कोणी देऊ शकेल ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारच देऊ शकेल. हे त्यांनादेखील माहिती आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आपण राज्य मागासवर्ग आयोगाला जबाबदारी दिली. अडीच कोटी घरांमध्ये जाऊन सर्व्हे करण्यात आला. त्यातील निष्कर्षांच्या आधारे मराठा समाजाला अशा प्रकारे आरक्षण देणं योग्य ठरेल असं मत महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग जस्टिस शुक्रे यांनी दिला. या अहवालातल्या शिफारसी आपण स्वीकारल्या आणि त्यावर आधारीत आरक्षण दिलं आहे. मी राज्य मागासवर्ग आयोगाचे आभार मानतो. त्याचप्रमाणे साडेतीन लाख कर्मचाऱ्यांनी यासाठी काम केलं त्यांचेही आभार मानतो आणि विरोधी पक्षांचेही आभार मानतो कारण त्यांनीही आम्हाला पाठिंबा दिला. एकीकडे आम्ही आरक्षणाचा प्रश्न सोडवला आहे आणि मराठा समाजाच्या उत्थानासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले आहे. शैक्षणिक आणि नोकरी साठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. सररकाच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. परंतु कोणत्या ठिकाणी नोकरी देण्यात येणार हे देखील सरकार कडून सांगितले तर सोन्यावरून पिवळे होईल असं उद्धव ठाकरे म्हणाले. मराठा समाजाला सध्या देण्यात आलेले हे आरक्षण कोर्टात टिकले पाहिजे,अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली.
