आत्याच्या विरोधात भाचा मैदानात ! जय पवार पुणे दौऱ्यात सक्रिय

आगामी बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच होणार असून ही निवडणूक चुरशीशी होणार असल्याचे चित्र सध्या बारामतीत आहे. थेट आत्याच्या उमेदवारी विरोधात प्रचार करणार असल्याचे स्पष्ट संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांनी दिले आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत आपल्याला एकाकी पाडले जात असल्याचा आरोप केला होता. त्याची प्रचिती काही दिवसात आली. कारण अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र श्रीनिवास पवार यांनी थेट खासदार सुप्रिया सुळे यांना पाठबळ देण्याचे संकेत दिले, तर अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार बारामतीत सक्रीय झाले. त्यांनी मात्र कुटुंबाला एकटे पाडल्यासारखे वाटत नाही, अशी प्रतिक्रिया दिली होती. एवढेच नव्हे, तर बारामती लोकसभा मतदारसंघात आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे पक्षफुटीचा कुठलाही परिणाम जाणवत नसल्याचे म्हटले. त्यामुळे बारामतीत पवार विरुद्ध पवार ही लढत रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार सातत्याने आक्रमक पवित्रा घेऊन थेट शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडत आहेत. त्यांचे बारामतीसह पुणे शहरातील कार्यक्रम वाढले असून, सातत्याने कुठे ना कुठे बैठका, सभा घेऊन त्यांचा हल्लाबोल सुरू आहे. परंतु शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे सातत्याने जुने कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटीवर भर देऊन पुन्हा लोकांचा विश्वास संपादन करत आहेत. त्यामुळे पवार कुटुंबातील दोन्ही गट आता चांगलेच कामाला लागल्याचे दिसत आहे. परंतु एकीकडे अजित पवार आक्रमक झालेले असताना शरद पवार गट मात्र, संयमाने कामाला लागला आहे. अजित पवार यांनी अद्याप उमेदवार कोण असणार, हे स्पष्ट केलेले नाही. परंतु सध्या तरी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार याच मैदानात उतरल्या असून, जाहीर प्रचाराला सुरूवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार सातत्याने पुणे दौऱ्यावर येत आहेत.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचे मोठे चिरंजीव पार्थ पवार यांच्यासोबतच छोटे चिरंजीव जय पवारही आता बारामतीसह सर्व तालुक्यात सक्रिय झाले आहेत. जय पवार यांनी राष्ट्रवादी भवनला भेट देऊन सोशल मीडियाच्या टीमची नेमणूक केली.उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या कार्यालयाला भेट दिली होती. यावेळी योगेंद्र पवार यांनी पवार साहेबांच्या सूचनेनुसार काम करणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांनी बारामती दौरा केला होता. गुरूवारी ते पुणे दौऱ्यावर विविध कार्यक्रमासाठी येणार आहेत.

यावेळी त्यांनी आगामी लोकसभेसाठी महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचे सांगितले.लोकसभेची तयारी म्हणून गुरूवारपासून दौऱ्याला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे कार्यालयाला देखील ते भेट देणार आहेत. आगामी लोकसभेच्या तयारी दरम्यान रॅली, पदयात्रा, भेटीगाठी, बैठका घेऊन नागरिकांच्या समस्या समजून घेण्यासाठी जय पवार सतत येतील, अशी महिती सुत्रांनी दिली आहे.

दरम्यान अजित पवारांचे सख्खे पुतणे युगेंद्र श्रीनिवास पवार यांनी नुकतीच शरद पवार कार्यालयाला भेट दिली होती. त्या भेटीबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, ” परिवारात ज्याची पसंती असेल ते लोक त्यांचा प्रचार करतील. जसं दादांनी भाषणात सांगितलं की कदाचित परिवारातील बाकीचे काही लोक माझा प्रचार करणार नाहीत. तसं आपण दुसऱ्यांना काही बोलू शकत नाही. त्यांना ज्यांचा प्रचार करायचा आहे त्यांना करू द्या. आपण आपला प्रचार करू”