जम्मू आणि काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज पहिलाच दौरा संपन्न झाला. श्रीनगरच्या बक्षी स्टेडियमवर झालेल्या जाहीर सभेत त्यानी 6,400 कोटींच्या विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन केले. यावेळी त्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये मागच्या पाच वर्षांत झालेल्या बदलांचा आढावा घेतला. कलम 370 हटविल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये विकासाची गंगा कशी पोहोचली? याची माहिती त्यांनी दिली. तसेच कलम 370 च्या नावावर काही राजकीय घराण्यांनी सामान्य जनतेची कशी दिशाभूल केली, याचीही माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात दिली.
यापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये विकास होत नव्हता. पण, आता विकासाला सुरुवात झाली आहे. काश्मीरमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. उद्देश चांगला असेल तर त्याचे चांगले परिणाम दिसून येतात. जम्मू-काश्मीरमध्ये जी-२० यशस्वीपणे पार पडले. गेल्या काही वर्षांपासून पर्यटनासाठी येणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. विदेशी पर्यटक जम्मू-काश्मीरमध्ये आल्याशिवाय राहत नाहीत. जम्मू-काश्मीरमधील केसर, सफरचंद यांना खूप महत्त्व आहे, असं मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘स्वातंत्र्यानंतर जम्मू-काश्मीर राज्य घराणेशाहीच्या राजकारणाचा सर्वात मोठा बळी ठरला आहे. आज हे लोक लोक म्हणतात की, मोदींना कुटुंब नाही, पण संपूर्ण देश त्याला चोख प्रत्युत्तर देत आहे. देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून लोक म्हणत आहेत, मी मोदींचा परिवार आहे. मी जम्मू-काश्मीरलाही माझे कुटुंब मानले आहे. पुढील 5 वर्षांत जम्मू-काश्मीरचा अधिक वेगाने विकास होईल. शांतता आणि उपासनेचा प्रतीक असणारा रमजान महिना काही दिवसांत सुरू होणार आहे. जम्मू-काश्मीरमधून मी संपूर्ण देशाला रमजानच्या शुभेच्छा देतो.
जम्मू-काश्मीरमध्ये आता काळ बदलला आहे. जम्मू-काश्मीर हा केवळ एक प्रदेश नसून भारताचे डोके आहे. विकसित काश्मीर ही विकसित भारताची प्राथमिकता आहे. यापूर्वी देशातील अनेक योजना काश्मीरपर्यंत पोहोचत नव्हत्या. आज जम्मू-काश्मीरला सर्व योजनांचा लाभ मिळतोय. मोदींनी दिलेल्या सर्व हमी पूर्ण होत आहेत. येथील तलावांमध्ये सर्वत्र कमळ पाहायला मिळते. 50 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या जम्मू काश्मीर क्रिकेट असोसिएशनच्या लोगोवरही कमळ आहे. हा योगायोग म्हणावा लागेल की, भाजपचे चिन्हही कमळ आहे, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
पर्यटनासोबतच जम्मू-काश्मीरमध्ये शेती आणि कृषी उत्पादनांचीही ताकद आहे. जम्मू काश्मीरचे केशर, सफरचंद, येथील मेवा, चेरी हे सर्व पाहाता जम्मू-काश्मीर हा एक मोठा ब्रँड असल्याचे त्यांनी सांगितले.
