मार्च महिना आता सरत आला आहे. एप्रिल महिना सुरू होण्याच्या आधीच उन्हाचे चटके बसू लागले आहेत. महाराष्ट्रातील काही भागात अवकाळी पावसाचा फटका बसला आहे तर काही भागान उकाडा वाढला आहे. मुंबईतही उन्हाचा पारा चढला आहे. गुरुवारपर्यंत मुंबईत उन्हाचा ताप आणखी चढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ३८ अंशापर्यंत उन्हाचा पारा चढू शकतो, असे प्रादेशिक हवामान विभागाने म्हटलं आहे.
मुंबईचे कमाल तापमान मंगळवारी अवघ्या २४ तासांमध्ये २.२ अंशांनी वाढले. कोकणामध्ये दमट आणि उष्ण हवामानामुळे अधिक त्रास जाणवू शकतो, असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे.मुंबईत मंगळवारी कुलाबा येथे ३२.२ तर, सांताक्रूझ येथे ३४.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. सोमवारपेक्षा कुलाबा येथे १.४ तर सांताक्रूझ येथे २.२ अंशांनी अधिक कमाल तापमान नोंदवले गेले. मुंबईच्या किमान तापमानामध्येही वाढ नोंदवली गेली असून कुलाबा येथे २३ तर सांताक्रूझ येथे २२.५ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले.
मध्य महाराष्ट्रात किमान तापमान तुरळक ठिकाणी १६ ते १७ अंशांदरम्यान आहे. मात्र कमाल तापमानाचा पारा ३५ ते ३८ अंशांदरम्यान पोहोचला आहे. जळगाव येथे ३६.७, जेऊर येथे ३७.५, कोल्हापूर येथे ३६.१, सांगली येथे ३७.२, सोलापूर येथे ३८.४ याप्रकारे कमाल तापमान मंगळवारी नोंदवले गेले. हे तापमान आत्ताच्या सरासरीच्या आसपास आहे.
दरम्यान, हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी विदर्भात गारपीट आणि वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मराठवाड्यावरही पावसाळी ढगांचं सावट असेल.
