गुजरातनेच मोदींसारखा महान कर्मयोगी पंतप्रधान दिला; स्वतःला सांभाळा म्हणत चित्रा वाघ यांचा संजय राऊतांवर पलटवार

औरंगजेब आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म गुजरातमध्ये झाला आहे. औरंगजेब दिल्ली काबीज करून महाराष्ट्रावर चाल करून आला होता. त्याचप्रमाणे आजची गुजराती वृत्ती दिल्लीतून राज्यावर चालून येत असल्याचे ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत म्हणाले होते. राऊतांच्या या टीकेला भाजपकडून सडेतोड उत्तर दिले जात आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राऊतांना सर्वज्ञानी म्हणत त्यांच्या विधानांमध्ये काहीच लॉजिक नसल्याचे म्हणत समाचार घेतला आहे.

पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा यांनी घाम आणि पैसा गाळूनदेखील कर्नाटकमध्ये भाजपाचा दारुण पराभव होईल आणि हा २०२४ या वर्षासाठी शुभशकुन असेल, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली होती. या टीकेला आता भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पंतप्रधान मोदी हे देशाला नव्या उंचीवर नेण्यासाठी घाम गाळत असून त्यांच्यावर बोलण्याची संजय राऊत यांची लायकी नाही, असे त्या म्हणाल्या. ट्वीटद्वारे त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

गुजरातने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा महान कर्मयोगी पंतप्रधान दिला. ही नुसती गुजराती बांधवांसाठी नाही, तर अवघ्या भारतवासीयांसाठी अभिमानाची बाब आहे असे म्हणत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर पलटवार केला आहे. खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना मोगल घराण्यातील सहावा बादशहा औरंगजेबशी केली होती. भाजप नेते राऊतांच्या या विधानाचा चांगलाच समाचार घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.

राऊतांच्या लॉजिकवर वाघ म्हणाल्या, आता याच लॅाजिकनुसार बोलायचे तर राऊत, त्यांचे नेते उद्धव ठाकरे आणि दाऊद इब्राहिम तिघेही कोकणात जन्मले आहेत. या तिघांनीही मुंबईसह कोकणप्रांत नासवला. पण या परिसरात जन्माला आलेल्या इतर शेकडो कर्तृत्ववानांनी तर त्याची किर्ती वाढवलेली आहे. त्यामुळे कोण कुठे जन्माला आले, यावरून तुम्ही कुठल्याच प्रांताला-राज्याला कमीपणाने लेखण्याचे कारण नाही, असे वाघ यांनी राऊतांना सुनावले आहे.

मोदीजींनी गरीबाचा कल्याण करण्याबरोबरच देशाला नव्या उंचीवर नेण्यासाठी घाम गाळत आहेत,तुमची लायकी पण नाही त्यांच्यावर बोलायची.बाकी टीका करणारे “भौंकते रहते है और हाथी चलता है ”असं चित्र वाघ यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हंटल आहे.

संजय राऊतांच्या या विधानानंतर भाजपने देखील त्यांना त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. भाजपा महाराष्ट्राने सोशल मीडियाच्या माध्यमातून राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. भाजपाने म्हटले की, मागे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, महाराष्ट्रात अचानक औरंग्याच्या औलादी वाढल्या त्यातल्याच काही आज बरळल्या… ज्यांनी रामाचे अस्तित्व नाकारले, टिपू सुलतानच्या कबरी सजवल्या अशा हिंदूद्वेषी काँग्रेसच्या धुणीभांडी करणाऱ्या घरगड्याने तोंड सांभाळून बोलावे. हिंदुत्वावर गरळ ओकणाऱ्या मालकाला जाब विचारणे तर लांबच मात्र ‘तमाम हिंदू बांधवांनो’ म्हणायला देखील ज्यांची जीभ वळली नाही त्यांनी ‘अंथरूण पाहूनच पाय पसरावेत’.