खासदार श्रीनिवास पाटील यांची सातारा लोकसभेतून माघार

सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. आपल्या प्रकृतीच्या कारणामुळे आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचे त्यांनी शरद पवार यांना कळवले आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटील यांनी विजय मिळवला होता. त्यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचा पराभव केला होता. त्यामुळे या वेळी पुन्हा एकदा शरद पवार हे श्रीनिवास पाटील यांनाच उमेदवारी देतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, आता श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघातून श्रीनिवास पाटलांनी माघार घेतल्यानंतर आता त्यांच्या जागी कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत अनेक शक्यता वर्तवण्यात येत आहेत. दरम्यान, बाळासाहेब पाटील यांच्या नावाची चर्चा सध्या सुरू आहे. बाळासाहेब पाटील हे राज्याच्या सहकार विभागाचे कॅबीनेट मंत्री राहिलेले आहेत. ते कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. श्रीनिवास पाटलांनी आपली उमेदवारी नाकारल्यानंतर आता शरद पवार कोणाला संधी देणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

शरद पवार आज सातारा दौऱ्यावर आहेत. उमेदवार कोण असावा? याबाबत ते विधानसभा मतदारसंघनिहाय बैठकीत निर्णय घेणार आहेत. आता सातारा लोकसभा निवडणुकीत उमेदवारी कुणाला द्यायची, असा प्रश्न शरद पवार यांच्यासमोर निर्माण झाला आहे. कार्यकर्त्यांनी श्रीनिवास पाटील उभे राहिल्यास त्यांचं काम करु अन्यथा शरद पवारांनी इथून उभं राहावं अशी मागणी केली आहे. लोकसभा निवडणूका तोंडावर आलेल्या असताना श्रीनिवास पाटील यांनी ऐनवेळी घेतलेली माघार शरद पवारांसाठी धक्का ठरली आहे. यापुढे शरद पवार सातारा मतदारसंघासाठी काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

कोरेगाव मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार शशिकांत शिंदेंना लोकसभेची उमेदवारी देण्याची मागणी केली. तर खासदार श्रीनिवास पाटील यांनी स्वत:च बैठकीत सर्वांपुढे आपण प्रकृतीच्या कारणास्तव यावेळेस सातारा लोकसभेची निवडणूक लढणार नाही. त्यामुळे नवीन उमेदवार द्यावा, अशी मागणी केली. एकुणच कराड, पाटण तालुक्यातून होणारा विरोध ओळखून पाटील यांनी ही भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे. तर स्वत: शरद पवार यांनीच साताऱ्यातून निवडणूक लढावी, अशी मागणी झाली. त्यामुळे शरद पवार आता काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.