मराठवाड्यात अवकाळी पावसाचे थैमान; चौघांचा मृत्यू; शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान

मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना मागील दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातल्याचे दिसत आहे. छत्रपती संभाजीनगरसह परभणी, जालना, नांदेड, हिंगोली, बीड जिल्ह्यातील अनेक भागांना अवकाळी पाऊस, गारपीट, वादळाचा फटका बसला आहे. आतापर्यंत चौघांचा मृत्यू झाला असून, शेकडो हेक्टरवरील ज्वारी, मका, बाजरी, फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मराठवाड्यात प्राथमिक अंदाजानुसार अवकाळी पावसामुळे 2 हजार 716 हेक्टर पिकांवरील नुकसान झाले आहेत. तर 777 हेक्‍टरवरील फळ पिकांचे झालं नुकसान झाले आहेत.

अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बीड जिल्ह्यात बसला असून या भागात लहान मोठी अशी सुमारे 84 जनावरे दगावली आहे. झाडांची पडझड झाली आहे.पावसामुळे मराठवाड्यातील 200 हुन अधिक गाव बाधित झाले असून शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा गारपिटीचा फटका बसला आहे. लातूर जिल्ह्यात तीन दिवस पावसाने हजेरी लावली असून अवकाळी पावसामुळे या जिल्ह्यात नऊ जनावरे दगावली आहे. 25 एकर पेक्षा अधिक फळ बागेचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे आकडेवारी प्रशासनाकडे येत असून प्रशासन कडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार राज्यात अवकाळी पावसाला आणि गारपिटीला सुरुवात झाली आहे. यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला असून आता पुन्हा हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यामुळे शेतकऱ्यांसमोरील संकट वाढणार आहे. 13 आणि 14 एप्रिल रोजी मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. विजांच्या कडकडाटासह हा पाऊस कोसळणार असल्याची माहिती देखील हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. तर, राज्यातील अनेक भागांमध्ये आज शनिवारी (ता. 13 एप्रिल) रेड आणि उद्या रविवारी (ता. 14 एप्रिल) ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

वाशिम हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, सलग चौथ्या दिवशीही वाशिम जिल्ह्यात वादळी वारासह विजेच्या कडकडाटात गारपीट झाल्याचं आज पुन्हा पाहायला मिळाले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिकची भर पडली आहे. भर उन्हाळ्यात अवकाळी पाऊस बरसात असल्याने उन्हाळी पिकासह फळबागांना या पावसाने अधिकचा फटका बसताना दिसतोय.