सांगली लोकसभेच्या मैदानातून विशाल पाटील यांची माघार नाहीच; अपक्ष उमेदवारी कायम

काँग्रेस नेत्यांच्या मनधरणीनंतरही विशाल पाटील यांनी त्यांचा अर्ज कायम ठेवलेला आहे. त्यामुळे सांगलीत महाविकास आघाडीची अडचण वाढली आहे. सांगलीत आता तिरंगी लढत होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. विशाल पाटील यांनी अर्ज मागे घ्यावा यासाठी महाविकास आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत. पण त्यांनी उमेदवारी कायम ठेवली. त्यामुळे आता सांगलीच्या रिंगणात तीन पाटील असतील. तिघांपैकी कोणते पाटील मैदान मारणार याचं उत्तर ४ जूनला मिळेल.

विशाल पाटील यांनी सोमवारी सकाळी कार्यकर्ते आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी आमदार विलासराव जगताप यांच्याशी चर्चा केली. कोणत्याही परिस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेऊ नये, अशी सूचना घोरपडे, जगताप यांनी विशाल पाटील यांना दिली आहे. त्यानुसार विशाल पाटील यांनी काँग्रेस पक्षाने काही कारवाई केली तरी उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही, अशी भूमिका स्पष्ट केली आहे. काँग्रेस आणि शिवसेनेचा दबाव झुगारून विशाल पाटलांनी आपली उमेदवारी कायम ठेवली. त्यामुळे भाजपाचे संजयकाका पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील आणि अपक्ष विशाल पाटील निवडणुकीच्या रिंगणार असणार आहेत. आत्तापर्यंत 25 पैकी शेवटच्या दिवशी पर्यंत 6 अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली आहे. सांगलीतल्या विशाल पाटलांच्या वसंतदादा भवन या संपर्क कार्यालयासमोर कार्यकर्त्यांची गर्दी जमू लागली होती. त्यामुळे विशाल पाटील मागे हटणार नाहीत, हे निश्चित झालं होतं.

विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज कायम ठेवल्याने विशाल पाटील यांचे मन वळवण्यात काँग्रेस नेत्यांना अपयश आल्याचे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांची शिष्टाई अयशस्वी ठरली आहे. विशाल पाटील यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता आहे. त्यामुळे सांगली लोकसभेसाठी तिरंगी लढत निश्चित आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील, भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील आणि अपक्ष विशाल पाटील यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. सांगली लोकसभेसाठी एकूण 21 उमेदवार रिंगणात असल्याने प्रत्येक बूथला दोन ईव्हीएम मशीन लावावे लागणार आहेत.

विशाल पाटील यांनी आपल्या कार्यालयाचं नाव बदलून ‘वसंतदादा भवन’ असं ठेवलं आहे. शिवाय कार्यालयात एकाही काँग्रेसच्या नेत्याचा फोटो नाही. पाटील घराण्यावर अन्याय झाला असल्याची भूमिका त्यांच्या समर्थकांनी घेतली आहे.काँग्रेसचे प्रमुख नेते चंद्रहार यांच्या प्रचारापासून चार हात दूर आहेत. त्यामुळे मविआसाठी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.