देशात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणूक पार पडली असून आता दुसऱ्या टप्प्यातील मतदान लवकरच होणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महायुतीला जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारासाठी मनसेही प्रचाराच्या मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता मनसेचे आमदार राजू पाटील यांनी ठाकरे गटाला थेट इशारा दिला आहे.
कल्याण: एक भाऊ लढत असताना दुसरा भाऊ पाठिंबा देत नाही, असा नरेटिव्ह सेट केला जातोय. नरेटिव्ह सेट करून लोकांसमोर जाऊ नका आमच्याकडे बोलण्यासारखं खूप आहे, असा इशारा मनसे आमदार राजू पाटील यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना दिलाय.आजतागायत इतक्या राजकीय घटना घडल्या उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना फोन केलाय का? घराच्या शेजारी शपथविधी होता त्यावेळेला सांगितलं नाही. तुम्ही तुमचं राजकारण करा मात्र नरेटिव्ह सेट करून लोकांसमोर जाऊ नका आमच्याकडे बोलण्यासारखं खूप आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी घेतलेल्या अनेक निर्णयापैकी हा एक निर्णय आहे. जेव्हा-जेव्हा फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदेंनी विचारलं. तेव्हा राज्यसभा असेल विधानसभा असेल अशा वेळेस आम्ही पाठिंबा दिलाय, त्यामुळे असं नाही की आत्ता बिनशर्त पाठिंबा दिलाय.
ही लोकसभा निवडणूक वाघाचा डीएनए टेस्ट आहे, आता लवकरच कळेल कोण नकली, कोण असली, त्यामुळे मी काही बोलू शकत नाही अशी प्रतिक्रिया मनसे आमदार राजू पाटील दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी कल्याण डोंबिवलीत काही नकली वाघ येऊन गेला, पोकळ डरकाळी फोडून गेला पण जोपर्यंत एकनाथ शिंदे रिंगमास्टर आहे तोपर्यंत वाघाचा कातडं पांघरणाऱ्या शेळ्या कधीही वाघ होणार नाहीत असा टोला नाव न घेता उद्धव ठाकरेंना लगावला होता. यावर मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
तसेच यावेळी बोलताना मनसे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होणार, श्रीकांत शिंदे यंदा हटट्रिक करतील मोठ्या बहुमताने निवडून येतील. 26 एप्रिलनंतर प्रचाराला वेग येणार आहे, त्या अनुषंगाने येत्या 26 तारखेच्या आधी अविनाश जाधव आणि मी मेळावे घेणार आहोत. कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांना तिकडे आमंत्रित करणार असल्याचं राजू पाटील यांनी सांगितलं.
