मुंबईसह कोकणात उन्हाचा पारा वाढला असताना, राज्यात इतर ठिकाणी अवकाळी पावसामुळे उन्हाच्या कडाक्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. विदर्भ, मराठवाडा यासह मध्य महाराष्ट्रातही अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. मात्र अनेक भागात मेघगर्जनेसह पावसाने पहाटेपासूनच हजेरी लावल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अशाच काही जिल्ह्यात हवामान खात्याने अवकाळी पावसासह गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली असून अलर्ट दिला आहे.
मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र विभागात गेल्या काही दिवसांपासून तीव्र उष्णतेचा कहर सुरू आहे. या उष्णतेमुळे हवेचे जोडक्षेत्र तयार होत आहे. याचा परिणाम म्हणून मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागात जोरदार वळिव पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव या जिल्ह्यांतील काही भागांमध्ये 9 मे ते 15 मे या काळात पाऊस होईल. तसेच मराठवाड्यातील लातूर, नांदेड, हिंगोली, बीड, परभणीसह संभाजीनगर आणि विदर्भातील काही भागांतही याच काळात वादळी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्र: 9 मे रोजी धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिकमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. संभाजीनगर आणि अहमदनगरमध्ये पुढील दोन-तीन दिवसांत गडगडाटीसह वादळी पाऊस पडू शकतो.
कोकण: सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, ठाणे, मुंबई आणि पालघरच्या काही भागात पुढील तीन दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र: पुणे, अहमदनगर, दक्षिण सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि सांगलीमध्ये 9 मे पासून पुढील दोन-तीन दिवसांत स्थानिक पावसाची शक्यता आहे. दिवसाचे तापमान जास्त राहण्याचा अंदाज आहे. 10 ते 17 मे दरम्यान काही भागात मुसळधार पाऊस पडू शकतो.
मराठवाडा: मराठवाड्यातील लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, बीड, धराशिव भागात जोरदार वळिव पाऊस होण्याची शक्यता विजय जायभावे यांनी व्यक्त केली आहे. 10 मे पासून ते 16 मे पर्यंत अनेक भागात पाऊस सरु राहील. 16 ते 17 मे या काळात देखील काही भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता विजय जायभावे यांनी व्यक्त केली आहे.
विदर्भात: विदर्भात पुढील एक आठवडा नागपूर, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, वाशीम, बुलढाणा आणि अकोल्यात तीव्र तापमान वाढ कायम राहील. तसेच काही ठिकाणी पावसाचा जोर देखील पाहायला मिळेल.
