लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार गटाचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण होऊ शकते. तसेच अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात, असे वक्तव्य राष्टवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते. या वक्तव्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण नक्की होणार, असे त्यांनी म्हटले. नाशिकच्या पिंपळगाव येथे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे आणि भारती पवार यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
ज्या दिवशी शिवसेना काँग्रेसमध्ये सामील होईल, त्यावेळी मी शिवसेना पक्ष संपलेला असेल, असं बाळासाहेबांनी म्हटलं होतं. नकली शिवसेनेनं बाळासाहेबांच्या सर्व स्वप्नांचा चक्काचूर केला आहे, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते नाशिकमध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ विकसित भारताच्या निर्धार सभेत बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, अयोध्येत भव्य राम मंदिर उभारावं व्हावं, असं बाळासाहेबांचं स्वप्न होतं. जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० हटवलं जावं, असं बाळासाहेबांचं स्वप्न होतं. हे स्वप्न पूर्ण झालं. पण यामुळं सर्वात जास्त चीड नकली शिवसेनेला आली आहे. काँग्रेसने राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण नाकारलं. नकली शिवसेनेनंही तोच मार्ग स्वीकारला. काँग्रेसचे लोक मंदिराबाबत अनाठायी गोष्टी बोलत आहेत आणि नकली शिवसेना एकदम गप्प आहे.
“महाराष्ट्राचा स्वाभिमानी आणि राष्ट्रभक्त जनता हे जेव्हा बघते, तेव्हा महाराष्ट्राच्या लोकांचा राग येतो. पण नकली शिवसेनेला अहंकार इतका मोठा आला आहे की, त्यांना महाराष्ट्राच्या लोकांच्या भावनांची पर्वा नाही. त्यांना काही फरक पडत नाही. काँग्रेससमोर गुडघं टेकणाऱ्या नकली शिवसेनेला शिक्षा देण्याचं मन पूर्ण महाराष्ट्राने बनवलं आहे. चार टप्प्यात मतदान झालं त्यामध्ये या लोकांना जनतेने चित केलं आहे”, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला.
‘काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळात कृषीमंत्री इथलेच होते, त्यावेळी शेतकऱ्यांना एक रुपया तरी मिळत होता का? आता शेतकऱ्यांना 6 हजार रुपये मिळत आहेत. कांदा स्टॉक करण्याचं काम आम्ही सुरू केलं आहे. 60 हजार मेट्रिक टन कांदा आम्ही पुन्हा स्टॉक करणार आहे. 35 टक्के कांदा निर्यात आमच्या काळात वाढली आहे, निर्यातीसाठीही आम्ही अनुदान दिलं आहे’, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
