4 जूननंतर पुन्हा राजकीय भूकंप, शरद पवार गट आणि ठाकरेंचा गट फुटणार; मोहित कंबोज यांचा दावा

राज्यातील लोकसभा निवडणुकीचे पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान 20 मे रोजी पार पडत आहे. यानंतर राजकीय वर्तुळाला साहजिकच 4 जूनच्या निकालाचे वेध लागली. मात्र, त्यापूर्वी भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. कंबोज यांनी ट्विट करुन महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप होण्याचे संकेत दिले आहेत. त्यांच्या या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

मोहित कंबोज यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 4 जून रोजी लोकसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत आणखी एक फूट पडले. दोन्ही पक्षांमधून आमदार, नेते आणि कार्यकर्ते राजीनामा देऊन बाहेर पडतील. हे सर्वजण सध्या इतर पक्षांच्या संपर्कात आहेत, असा दावा मोहित कंबोज यांनी केला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर खरोखरच ठाकरे गट आणि शरद पवार गटातील उर्वरित आमदार उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची साथ सोडून सत्ताधारी गटात सामील होणार का, हे आगामी काळात स्पष्ट होईल. आता मोहित कंबोज यांच्या या दाव्यानंतर शरद पवार गट आणि ठाकरे गट काय प्रतिक्रिया देणार, याकडेही सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

चार जून रोजी लोकसभा निवडणुकांचे निकाल हाती येणार आहेत. या निकालावर बरेच राजकीय समीकरणे अवलंबून असणार आहे. राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात किती जागांचे अंतर राहत, यावरही अनेक समीकरण ठरणार आहेत. दरम्यान भाजप नेत्याने केलेल्या राजकीय भूकंप होणार असल्याचा दाव्यामुळे आता एकच चर्चा सुरु झाली आहे.