पुण्यात वेदांत अग्रवाल या अल्पवयीन मुलाने दारुच्या नशेत आपल्या पोर्शे कारने दोघांना चिरडल्याची घटना घडली होती. वेदांत चालवत असलेली पोर्शे कार तब्बल ताशी 200 किमी च्या वेगाने एका बाईकला धडकली होती. यामध्ये बाईकवर बसलेल्या अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर पोलिसांनी वेदांत अग्रवाल याच्यावर कारवाई करण्यात चालढकल केली होती. त्यामुळे वेदांत अग्रवाल अवघ्या 15 तासांमध्ये जामिनावर बाहेर आला होता. वेदांत अग्रवाल हा पुण्यातील बडे उद्योजक विशाल अग्रवाल यांचा मुलगा आहे. त्यामुळेच पोलिसांकडून कारवाईत दिरंगाई झाल्याचा आरोप झाला होता. या सगळ्यामुळे सामान्य जनता संतापली होती.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांशी फोनवर संपर्क साधला आणि कुणालाही पाठीशी घालू नका, असे निर्देश दिल्याची माहिती देण्यात आली आहे.
मी कार चालविण्याचे रीतसर प्रशिक्षण घेतलेले नाही, वाहन चालविण्याचा परवानाही नाही, तरीदेखील वडिलांनीच त्यांच्या मालकीची ग्रे रंगाची पोर्श कार माझ्याकडे दिली, तसेच मित्रांसमवेत हॉटेलमध्ये पार्टी करण्यास परवानगी दिली. मी मद्यप्राशन करीत असल्याचेही वडिलांना माहिती आहे, असे अल्पवयीन आरोपीने पोलिसांना सांगितले. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणाची दखल घेत पोलिसांना निर्देश दिले होते. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयुक्तांशी संवाद साधला.
अपघात प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी व्हावी, संजय शिरसाटांची मागणी
पुणे अपघात प्रकरणी संजय शिरसाट यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पुणे अपघात प्रकरणात माजलेल्या बापाच्या मुलांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. हे सलमानसारखं प्रकरण आहे, आरोपवीर कठोर कारवाई झाली पाहिजे. याची एसआयटी मार्फत चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी शिरसाट यांनी केली.ते माजलेल्या बापाची मुलं असतात ना, त्यांच्याकडून असे अपघात होत असतील ना तर त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई केली पाहिजे. याला पक्ष नाही, याला जात नाही, याला धर्म नाही. कोणत्याही गरिबाच्या, सर्वसामान्याच्या शरीरावर गाडी चालवायची, आणि त्यात त्याचा मृत्यू होतो. अन मग हे फरार होतात. अशा लोकांना कोणीही पाठिशी घालणार नाही. तो कितीही मोठ्या बापाचा लेक असला तरीही. असं संजय शिरसाट म्हणाले.
