रक्ताचा नमुना आईचा असल्याचे सिद्ध; न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेचा अहवाल कोर्टात सादर

पुण्यातील कल्याणीनगर येथे विशाल अगरवाल या बड्या बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने आलीशान पोर्शे कार भरधाव वेगात चालवत दोघांना चिरडले होते. हा पघात झाल्यावर त्याला अटक करून त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यासाठी ससुनमध्ये नेण्यात आले होते. मात्र, अर्थपूर्ण व्यवहार झाल्यावर हे नमुने बदलण्यात आले होते. या प्रकरणी सध्या ससुनचे डॉक्टर व शिपायाला आणि अगरवाल दाम्पत्याला अटक केली असून ते पोलिस कोठडीत आहे. दरम्यान, मुलाचे बदलले रक्ताचे नमुने कुणाचे होते, या बाबत पोलिस तपासात महत्वाची माहिती पुढे आली आहे. न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेचा अहवालात बदललेले रक्ताचे नमुने हे आरोपी मुलाची आई शिवानी अगरवाल यांचे असल्याचे तपासात पुढे आले आहे.

कल्याणीनगर अपघात प्रकरणात रोज अनेक बाबी पुढे येत आहेत. मुलाला वाचविण्यासाठी आई शिवानी अगरवालने मुलाच्या रक्ताचे नमुने बदलून त्यांच्या रक्ताचे नमुने दिला असल्याचे प्रादेशिक न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशालेच्या अहवालात पुढे आले आहे. हा अहवाल पुढे पोलिसांनी बुधवारी न्यायालयात सादर केला. यानंतर न्यायालयाने अल्पवयीन मुलीच्या पालकांना १० जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तर ससूनमधील डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर, शिपाई अतुल घटकांबळे यांना ७ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

याच गुन्ह्यात ससूनच्या न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल, मुंबर्इने दोघांना कारणे दाखवा नोटीस पाठवून सात दिवसाच्या आत म्हणणे मांडायला सांगितले आहेत. डॉ. हाळनोर यांच्यावतीने बाजू मांडतांना ॲड ऋषिकेश गानू यांनी न्यायालयात सांगितले की, डॉ. हाळनोर यांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची कारणे दाखवा नोटीस मंगळवारी मिळाली आहे.

आरोपी मुलाचे रक्ताचे नमुने बदलून शिवानी अगरवाल यांनी स्वत:चे रक्ताचे नमुने दिले होते. हे नमुने पोलिसांनी जप्त केले होते. तसेच ते तपासण्यासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होत. याकहा अहवाल सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांनी न्यायालयात सादर केला. तसेच या प्रकरणी आणखी तपास करण्यासाठी आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ मिळावी अशी मागणी केली.