दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता 


विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ पक्षाने रेखा गुप्ता यांची नेतेपदी निवड केली आहे. त्यामुळे रेखा गुप्ता या दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपा विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी निवड केल्यानंतर रेखा गुप्ता यांनी पक्षाने त्यांना आशीर्वाद दिल्याचे म्हटले आहे. ( Rekha Gupta is the new Chief Minister of Delhi)

भाजपने त्यांच्या एक्स हँडलवर दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाबाबतची माहिती देत रेखा गुप्ता यांचे अभिनंदन केले आहे. भाजपाने पोस्ट करत म्हटले की, “दिल्ली भाजपा विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्याबद्दल रेखा गुप्ता यांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. तुमच्या नेतृत्वाखाली राज्य प्रगती करेल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.”

नुकत्याच पार पडलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने चमकदार कामगिरी करत ७० पैकी ४८ जागा जिंकल्या होत्या.

रेखा गुप्ता यंदाच्या निवडणुकीत दिल्लीच्या शालीमार बाग विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्या भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा देखील आहेत. २०२५ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत रेखा गुप्ता यांनी शालीमार बाग विधानसभा मतदारसंघातून आम आदमी पक्षाच्या वंदना कुमारी यांचा २९५९५ मतांनी पराभव केला आहे. हरियाणातील जिंद जिल्ह्यात जन्मलेल्या रेखा गुप्ता ५० वर्षांच्या आहेत. रेखा गुप्ता यांचे कुटुंब १९७६ मध्ये दिल्लीला स्थलांतरित झाले होते. त्यानंतर त्यांचे शिक्षण आणि राजकीय कारकिर्द दिल्लीतच घडली. रेखा गुप्ता  एलएलबी  असून व्यवसायाने वकील देखील आहेत.

दिल्लीत भारतीय जनता पक्षाने ४८ तर आम आदमी पक्षाने २२ जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेसला यंदा सलग तिसऱ्या विधानसभा निवडणुकीत एकही जागा जिंकता आलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *