विशेष प्रतिनिधी
तुळजापूर: छत्रपती शिवराय हे आमचे आराध्य दैवत आहेत. त्यांचा मान, सन्मान, स्वाभिमान रहावा यासाठी जे लागेल ते करू. छत्रपतींचा अवमान करणाऱ्यांना कडक शासन व्हावे अशी उदयन महाराजांची मागणी आहे. ते निश्चित करू. त्याचबरोबर छत्रपतींच्या वंशजांना जे पुरावे मागतात त्यांनाही कडक शासन झाले पाहिजे. ( Strict action should be taken against those who ask Chhatrapati’s descendants for evidence, says Chief Minister)
शिवसेना ठाकरे गटाची खासदार संजय राऊत यांनी छत्रपतींचे वंशज असल्याचे काही पुरावे आहेत असे विधान केले होते. यावर तुळजापूर येथे पत्रकारांची बोलताना मुख्यमंत्री फडणवीस राऊत यांचे नाव न घेता टोला मारताना म्हणाले, छत्रपतींच्या वंशजांना जे पुरावे मागतात त्यांनाही कडक शासन झाले पाहिजे.
रायगडावरील वाघ्या कुत्र्याचे स्मारक हटवावे अशी मागणी छत्रपती केली आहे. यासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकारला पत्र लिहिले असून ३१ मे पर्यंतची मुदत देखील दिली आहे. धनगर समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी वाघ्या कुत्र्याचे स्मारक हटवण्यास विरोध दर्शविला आहे.
यावर मुख्यमंत्री म्हणाले, इतकी वर्ष झाले त्या ठिकाणी तो वाघ्याचा पुतळा किंवा समाधी आहे. त्यामुळे या प्रकरणात सर्वांशी चर्चा करून वाद न करता मार्ग निघू शकतो. प्रत्येक गोष्टीत वाद केलाच पाहिजे असं काही आहे का? वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत सर्वांनी एकत्र बसून चर्चेतून मार्ग काढला पाहिजे. या संदर्भात सगळ्यांशी चर्चा करावी लागेल. कारण शेवटी त्याच्याकरिता पैसे होळकरांनी दिलेले आहेत. त्यामुळे तो असा कसा काढून टाकणार? याबाबत मोठ्या प्रमाणात समाजाचा रोष देखील आहे.
वाद करण्याचे काही कारण नाही. सगळ्यांनी बसून मार्ग काढावा. उगाच दोन समाज एकमेकांसमोर उभे झालेले दिसतात. इकडे धनगर समाज वेगळा आणि इकडे मराठा समाज वेगळा असं काही नाही. सगळे समाज एकमेकांसोबतचे समाज आहेत. त्यामुळे या बाबतीत वाद करणं अयोग्य आहे. बसून मार्ग काढला पाहिजे,” असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
