विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेला काँग्रेसचाच तिसऱ्या चौथ्या क्रमांकाचा नेता फोडून शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण कोकण पादाक्रांत करण्याच्या वल्गना सुरू केल्या आहेत. ( Congress leader in UBT and Uddhav Thackerays accusations of conquering Konkan)
गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाला कोकणात मोठी गळती लागली आहे. ठाकरे गटाला विधानसभा निवडणुकीनंतर कोकणात सातत्याने हादरे बसत आहेत. माजी आमदार राजन साळवी यांनी नुकतीच ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला. ठाकरे गटाचे विलास चाळके व राजेंद्र महाडिक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सत्ताधारी शिवसेनेत प्रवेश केला.
गेल्या अनेक दिवसांपासून कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेला_ऑपरेशन टायगर आणि भाजपच्या सत्तेतील वाढत्या प्रभावामुळे खिंडार पडत होतं. शिंदे यांच्या बंडामुळे येथे माजी आमदारांनी ठाकरेंची साथ सोडली होती. तर पक्ष फुटीचे लोन हे स्थानिक स्वराज्य संस्थांपासून थेट ग्रामपंचायतपर्यंत पोहचले आहे.
कोकणातील काँग्रेस नेते सहदेव बेटकर यांनी उद्धव ठाकरे गटात आज प्रवेश केला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, संजय तुम्ही म्हणालात कोकणात एक पाऊल टाका, मी कोकणात फक्त एक पाऊल टाकणार नाही, तर संपूर्ण कोकण पादाक्रांत करणार. बघू, कोण मध्ये येतय. लोकसभा काय, विधानसभा काय कोकणातला निकाल सर्वांना अनपेक्षित होता. कोणी, कसा विजय मिळवला त्याच्या सूरस कथा बाहेर येत आहेत. ज्यांनी थापा मारल्या ते आता हात वर करुन मोकळे झालेत.
संजय राऊत म्हणाले की, “आपण सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते, शिवसैनिक आहात. सहदेवाच्या येण्याने नवीन कुरुक्षेत्रावर महायुद्ध सुरु झालेलं आहे. हे कोकणातलं युद्ध आपण जिंकणारच आहोत” “अनेकांनी सहदेवाना सांगितलय हे शेवटचं मैदान, आता मैदान बदलायचं नाही. आता याच मैदानात रत्नागिरी जिल्हा संपूर्ण भगवा करुन ते ठेकेदारांच राज्य संपवून टाका. मी उद्धव ठाकरेंना इतकच सांगेन कोकण असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्र कोकणातील एक कार्यकर्त्याच्या प्रवेशासाठी किती कार्यकर्ते आलेत. शिवसैनिक आलेत. सगळं जागेवर आहे, बाहेर फक्त हवा आहे. बाहेरच्या हवेची दिशा बदलताना मला दिसतेय, आपण फक्त कोकणात एक दौरा करा. आपण कोकणच्या भूमीवर एक पाऊल ठेवा, पहा कशी दाणादाण उडते” असं संजय राऊत म्हणाले. ‘एक गद्दार राहणार नाही औषधाला. कोकणात खूप लढाया केल्या आहेत’ असं संजय राऊत म्हणाले.
बेटकर यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ५२ हजार मते मिळवली होती. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने सहदेव बेटकरांचा येथील गावांशी, वाड्यांशी, कार्यकर्त्यांशी चांगला संपर्क होता. २०१९ च्या निवडणुकीत ते काँग्रेसचे उमेदवार होते. निवडणुकीपूर्वी जिल्हा परिषद सदस्य, सभापती म्हणून ते सक्रीय होते. पण पराभूत झाल्यानंतर सहदेव बेटकर सक्रीय नव्हते.
गुहागर विधानसभा मतदारसंघातून भास्कर जाधव हे ठाकरे गटाचे कोकणातील एकमेव आमदार आहेत. त्याच मतदारसंघात जाधव यांच्या विरोधात लढलेल्या नेत्याला पक्षात प्रवेश देऊन उद्धव ठाकरे यांनी काय साध्य केले असा प्रश्न प्रश्न विचारला जात आहे. यामुळे भास्कर जाधव नाराज असल्याचीही चर्चा आहे.
