प्रियंका गांधींच्या पतीची नवटंकी! चालत पोहोचले ईडी कार्यालयात

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. गुरुग्राम जमीन घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स बजावल्यावर वाड्रा मंगळवारी ‘चालत’ ईडी कार्यालयात पोहोचले. त्यांच्या या ‘वॉकिंग एन्ट्री’ने राजकीय रंग घेतला असून, अनेकांनी याला नवटंकी म्हटलं आहे. ( Priyanka Gandhis husbands latest move! He reached the ED office on foot.)

वाड्रा यांच्यावर गुरुग्रामच्या शिकोपूर गावातील जमीन व्यवहारात मनी लाँडरिंगचे आरोप आहेत. याच प्रकरणात ईडीने त्यांना दुसरे समन्स बजावले होते. याआधी ८ एप्रिल रोजीही समन्स पाठवण्यात आला होता, परंतु वाड्रा अनुपस्थित होते.

ईडी कार्यालयात जाताना वाड्रा यांनी माध्यमांशी बोलताना दावा केला, “जेव्हा जेव्हा मी जनतेचा आवाज उठवतो, तेव्हा केंद्र सरकार एजन्सींचा गैरवापर करून मला दाबण्याचा प्रयत्न करते. मी २३ हजार कागदपत्रे आधीच दिली आहेत. २० वेळा चौकशीला गेलो आहे. तरीही पुन्हा समन्स?”

प्रकरण काय आहे?
२००८ मध्ये वाड्रा यांच्या स्कायलाईट हॉस्पिटॅलिटी कंपनीने ओंकारेश्वर प्रॉपर्टीजकडून ७.५ कोटींना ३.५ एकर जमीन खरेदी केली. नंतर हुडा सरकारने त्याच जमिनीवर निवासी वसाहत बांधण्याची परवानगी दिली. अवघ्या काही महिन्यांत ही जमीन डीएलएफला ५८ कोटींना विकण्यात आली, आणि वाड्रांनी ५० कोटींपेक्षा अधिक नफा कमावला.

माजी मुख्यमंत्री हुड्डा देखील संशयाच्या भोवऱ्यात
याच प्रकरणात हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंग हुड्डा यांच्यावरही आरोप आहेत. तत्कालीन काँग्रेस सरकारच्या काळात वाड्रा यांना लाभ मिळवून देण्यासाठी नियम धाब्यावर बसवले गेल्याचा आरोप आहे.

ईडीच्या तपासाचा केंद्रबिंदू
२०१८ मध्ये दाखल एफआयआरच्या आधारावर ईडीने मनी लाँडरिंगचा गुन्हा नोंदवला. चौकशी स्कायलाईट हॉस्पिटॅलिटीचे व्यवहार, जमिनीचे पैसे, डीएलएफसोबतचा करार आणि त्यातून मिळालेल्या रकमेचा वापर यावर केंद्रित आहे. ईडीच्या मते, या व्यवहारातून डीएलएफला ५,००० कोटी रुपयांचा अनुचित फायदा मिळाल्याचा संशय आहे.

राजकीय स्टंट की सत्य?
रॉबर्ट वाड्रा यांची चालत ईडी कार्यालयात हजेरी ही एक बाजू असली, तरी त्यामागे राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. ईडीच्या समन्सला उत्तर देण्याऐवजी जनतेच्या समोर सहानुभूती मिळवण्यासाठी हे नाट्य केलं जातंय का, असा सवाल उपस्थित होत आहे.