विशेष प्रतिनिधी
राजकारण हे नेतृत्वावर उभं असतं. आणि जेव्हा एखादा नेता स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यात अपयशी ठरतो, तेव्हा त्याला भूतकाळाच्या सावलीत वावरावं लागतं. आज उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत हेच दिसून येत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या धगधगत्या नेत्यानंतर त्यांच्या नावाचा आणि आवाजाचा आधार घेणं ही केवळ आठवणीत रमण्याची भावना नसून, ती उद्धव ठाकरे यांच्या दुर्बल नेतृत्वाची आणि अस्थिर संघटनात्मक स्थितीची जाणीव करून देणारी गोष्ट आहे. ( AIs support and Balasahebs charisma Uddhav Thackerays admission of failure)
काल नाशिकमध्ये आयोजित ठाकरेंच्या शिवसेनेच्या मेळाव्यात AI तंत्रज्ञानाच्या साहाय्याने बाळासाहेबांचा आवाज ऐकवण्यात आला आणि त्यात भाजपा व शिंदे गटावर टीका करून, ‘परत फिरा रे’ असा साद घालण्यात आला. पण खरा प्रश्न असा आहे की, तेरा वर्षांनंतरही उद्धव ठाकरे यांना स्वतःच्या शब्दांना वजन देण्याची गरज वाटत नाही का? का त्यांना अजूनही वडिलांच्या करिष्म्याच्या कुबड्यांची गरज भासते?
बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला केवळ राजकीय पक्ष म्हणून नाही तर एक भावनिक आंदोलन म्हणून उभं केलं. त्यांच्या शब्दांनी लोकांच्या मनात थेट ठसा उमटवला. पण त्यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्या भावना राजकारणात जपल्या नाहीत. २०१९ साली काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत केलेली अस्वाभाविक युती, ऑनलाइन मुख्यमंत्रीपदाचा अलिप्त कार्यकाळ, कार्यकर्त्यांशी तुटलेला संवाद आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांवरचा उडालेला विश्वास, यामुळेच २०२२ मध्ये एकनाथ शिंदेंसारख्या बंडखोरांनी शिवसेना उघडपणे फोडली.
आज परिस्थिती अशी आहे की, ठाकरे गटाला चिन्ह नाही, नाव नाही, आणि कार्यकर्तेही हळूहळू निघून जात आहेत. प्रत्येक आठवड्याला नगरसेवक, पदाधिकारी, माजी आमदार हे शिंदे गटात किंवा भाजपात प्रवेश करत आहेत. ही केवळ गळती नाही, तर ही नेतृत्वावरचा अविश्वास आहे. ज्या मुंबईत शिवसेना जन्मली, जिथं तिचं बाळकडू होतं, तिथंच आज शिवसेनेला उमेदवार सापडणं कठीण झालंय.
या सर्व पार्श्वभूमीवर एआयच्या सहाय्याने बाळासाहेबांच्या आवाजाचा राजकारणासाठी वापर करणं म्हणजे केवळ भावनांची ढाल घेणं नाही, तर स्वतःच्या असमर्थतेची स्पष्ट कबुली आहे. तंत्रज्ञानाचा वापर प्रेरणादायक ठरू शकतो, पण जेव्हा तो स्वतःचं अस्तित्व वाचवण्यासाठी वापरला जातो, तेव्हा तो कमकुवतपणाचा पुरावा ठरतो.
आजचा मतदार भावनेच्या लाटेवर नव्हे तर विश्वासाच्या बळावर निर्णय घेतो. जेव्हा नेता स्वतःलाच सिद्ध करू शकत नाही, तेव्हा त्याच्या मागे कोण उभं राहणार?
एकूण परिस्थिती पाहता, उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व अपयशी ठरत चाललंय हे उघड आहे. संघटना फुटली, नेतृत्व नाकारलं गेलं आणि आता प्रचारासाठी बाळासाहेबांच्या आवाजावर अवलंबून राहणं ही शोकांतिका आहे.
