विशेष प्रतिनिधी
पिंपरी : क्रांतिवीर चापेकर बंधू हे छत्रपती शिवरायांच्या चरित्रामुळे भारावलेले होते. शिवराय एकप्रकारे दैवत होते. शिवरायांवर त्यांनी पोवाडे रचले. शिवरायांचीच प्रेरणा चापेकर बंधूंना मिळत होती. त्यामुळेच त्यांनी इंग्रज अधिकारी रॅंडचा केलेला वध हा स्वातंत्र्य लढ्यातील जाज्वल्य इतिहास रचला गेला. त्यानंतर क्रांतिकारकांची एक मोठी पिढी निर्माण झाली,’’ असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. ( Chafekar Brothers Were Inspired by the Legacy of Shivaji Maharaj CM Devendra Fadnavis)
क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या वतीने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सहयोगाने उभारलेल्या क्रांतिवीर चापेकर बंधू जीवन प्रसंग दृक्-श्राव्य संग्रहालयाचे लोकार्पण आणि राष्ट्रीय संग्रहालयाच्या कामाचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री जयप्रकाश रावळ, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, उमा खापरे, अमित गोरखे, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे, महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यासह चापेकर बंधूंचे वंशज उपस्थित होते. त्यांचा सन्मान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.
मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘चापेकर बंधू यांचे शौर्य हे भारतीय क्रांतिकारकांच्या इतिहासातील अतुलनीय राहिले आहे. चापेकर बंधू यांचे स्मारक होणे महत्त्वाची गोष्ट आहे. स्मारक अतिशय सुंदर झाले आहे. तंत्रज्ञानाचा योग्य वापर इथे केला आहे. चापेकर बंधुंच्या जीवनातील १४ प्रसंग पाहायला मिळतात. पुतळ्यांतून हे प्रसंग साकारले आहेत. प्रत्यक्ष ती व्यक्ती तिथे बसलेली आहे, असे वाटते. दृकश्राव्य माध्यमातून ते प्रसंग समजून घेता येतील, अशी व्यवस्था आहे. या प्रसंगातून चापेकर परिवार कसा होता? त्यांचा संसार कसा होता? त्यांच्या विचारांची पद्धत काय होती? या सर्व गोष्टी पाहायला मिळतात. कारागृहात फाशीची शिक्षा होण्यापूर्वी त्यांनी मागितलेली भगवद्गीता हा प्रसंग पाहायला मिळतो. पुण्यात प्लेगची साथ असताना इंग्रजांचे जुलूम वाढलेले होते. संपत्ती जप्त करायचे. अन्याय, अत्याचार होत होते. हे थांबले पाहिजे, यासाठी लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी क्रांतिकारकांना प्रेरणा दिली. चापेकर बंधूंच्या डोक्यातही हेच विचार होते. त्यातूनच त्यांनी रॅंडचा वध केला. पण, दुर्दैवाने फितुरीमुळे ते पकडले गेले. त्यानंतरही त्यांनी माघार घेतली नाही. फाशीला सामोरे गेले पण, इंग्रजांमुळे झुकले नाही.’
हुतात्मांच्या कार्यातून देशभक्तीची प्रेरणा मिळत असते. चापेकर बंधु अशाच हुतात्मांपैकी एक होते. स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी दिलेले योगदान अमूल्य आहे. त्यांचे कार्य चापेकर स्मारकाच्या माध्यमातून नागरिकांसमोर येणार असून हे केंद्र खऱ्या अर्थाने देशभक्तीचे संस्कार देणारे ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
‘क्रांतीवीर चापेकर स्मारकाचे बांधकाम अतिशय अप्रतिम केले आहे. या वाड्याच्या पुनर्बांधणीमुळे देशभक्तीचा नवा हुंकार पेटला आहे. क्रांतीवीर चापेकर स्मारकाच्या उद्घाटनाचा हा क्षण देशभरातील जनतेसाठी अभिमानाचा, स्वाभिमानाचा आणि आनंदाचा क्षण असून ब्रिटीश सरकारच्या अन्यायाविरोधात केलेल्या एल्गाराची आठवण आहे. समाजसुधारकांच्या आणि क्रांतिकारकांच्या सेवा, त्याग समर्पणातून आपला देश घडला आहे. त्यांच्यामुळे मिळालेले स्वातंत्र्य अखंड राखणे, संविधानिक मुल्यांचे संरक्षण करणे, विविधतेमध्ये असलेली एकता जपणे, हे आपले कर्तव्य आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व महाराष्ट्राने नेहमीच केलेले आहे. तसेच आपल्या देशासाठी बलिदान दिलेल्या चापेकर बंधु, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांचे बलिदान आपण कायम लक्षात ठेवले पाहिजे. न्याय, समता, बंधुता, स्वातंत्र्य, समानता या संविधानिक मुल्यांची जपवणूक करून ती मुल्ये पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे,’ असेही मुख्यमंत्री म्हणाले.
चापेकर बंधुंपासून प्रेरणा घेऊ ः मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते क्रांतिवीर चापेकर स्मारकाचे लोकार्पण होणार होते. मात्र, तांत्रिक कारणांमुळे ते येऊ शकले नाहीत. त्यांनी दृकश्राव्य माध्यमातून मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘हा केवळ संयोग नाही की, भारतीय अनेक विभुतींचा सहयोग महाराष्ट्राच्या भूमीशी राहिला आहे. यात चापेकर बंधू अग्रस्थानी आहेत.’’ चापेकर बंधूंच्या जीवनातील काही प्रसंगही मोदी यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘चापेकर बंधू स्मारक भावी पिढीसाठी राष्ट्रप्रेम व दायित्वाचे प्रतीक बनेल. चापेकर बंधूंपासून प्रेरणा घेऊन विकसित भारताचा संकल्प करू या.’’
