विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिकेतील दौऱ्यात भारतीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत भारतीय लोकशाही संस्थांची बदनामी केली आहे. यावर आता देशभरातून संताप व्यक्त होत असून, राहुल गांधींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. ( Indian democracy defamed abroadDemand for suo moto case against Rahul Gandhi)
निवडणूक आयोगाच्या अधिकृत माहितीनुसार, महाराष्ट्रातील मागील निवडणुकीत ९७,६४० मतदान केंद्रे होती. राहुल गांधी यांनी आरोप केला की निवडणुकीत अंतिम दोन तासांत मोठ्या प्रमाणावर मतदान झाले आणि त्यावर संशय व्यक्त केला. मात्र, तज्ज्ञांनी मांडलेले आकडे सांगतात की, दर ३ मिनिटात एक मतदान झाले असे मानले, तरी देखील हे प्रमाण ३९ लाख मतदारांपर्यंत सहज पोहोचते.
वास्तविक, एक मतदार सरासरी २ मिनिटांत मतदान करतो, तर हेच मतदान सहजपणे ५९ लाखांहून अधिक जाऊ शकते. अनेक केंद्रांवर मतदारांच्या उत्साहामुळे ही वेळ १.५ मिनिटांपर्यंत सुद्धा कमी होते. अशा स्थितीत, राहुल गांधी यांनी केलेला आरोप केवळ अतिशयोक्त व तथ्यहीन असल्याचे स्पष्ट होते.
सरकारने जर खरोखरच गैरप्रकार करायचा ठरवला असता, तर तो ५-५० केंद्रांवर नव्हे तर ५० ते ७० हजार केंद्रांवर करावा लागला असता. इतक्या प्रचंड प्रमाणावर गैरप्रकार घडूनही, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव गट), मनसे, वंचित बहुजन आघाडी, तसेच माध्यम आणि सोशल मीडिया कार्यकर्ते यांना त्याच क्षणी त्याचा पत्ता लागला नाही, हेच एक गंभीर प्रश्न आहे.
ही सगळी चर्चा निकालानंतरच कशी उफाळून येते? निकाल युतीच्या बाजूने लागल्यानंतरच आरोप का होतात? हे दाखवते की हे केवळ राजकीय असंतोषातून प्रेरित आरोप आहेत. त्यामुळे राहुल गांधींवर निवडणूक आयोगाने ‘सुओ मोटो’ खटला दाखल करावा आणि देशविरोधी विधानांबाबत कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.
