पाकिस्तान दोन तुकडे करा आणि पीओके भारतात विलीन करा , तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचे पंतप्रधान मोदींना आवाहन

विशेष प्रतिनिधी
हैदराबाद : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन केले की, “पाकिस्तानाचे दोन तुकडे करा आणि पाकिस्तान अधिकृत काश्मीर (PoK) भारतात विलीन करा. आम्ही सर्व १४० कोटी भारतीय तुमच्या सोबत आहोत. ( Break Pakistan into two and merge PoK with IndiaTelangana Chief Minister Revanth Reddy appeals to PM Modi)

हैदराबादमध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आयोजित केलेल्या कँडल मार्चदरम्यान रेवंत रेड्डी बोलत होते. त्यांनी म्हटले, “आज दहशतवाद्यांनी आपल्या नागरिकांवर हल्ला केला आहे. त्यामुळे सर्व भारतीयांच्या ह्रदयात आग धगधगते आहे. ही वेळ राजकारणाचा नाही, तर निर्णायक कारवाईचा आहे.”

रेड्डी यांनी इतिहासाची आठवण करून देताना सांगितले की, “१९६७ मध्ये चीनने भारतावर हल्ला केला तेव्हा इंदिरा गांधींनी खंबीर प्रतिसाद दिला. १९७१ मध्ये पाकिस्तानने आक्रमण केल्यावर त्यांनी पाकिस्तानाचे दोन तुकडे करून बांगलादेश निर्माण केला. आज पुन्हा तीच वेळ आली आहे . पाकिस्तानला धडा शिकवायची गरज आहे. आता चर्चा नको. आता निर्णायक पावले उचलायची गरज आहे. पाकिस्तानच्या कारवायांचा सडेतोड प्रतिकार करायला हवा.”

याच कँडल मार्चमध्ये एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनीही सहभाग घेतला. त्यांनी पोस्ट करत म्हटले, “आम्ही सर्वजण दहशतवादाविरोधात एकत्र आहोत. मी रेवंत रेड्डी आणि हजारो भारतीय नागरिकांसोबत पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या विरोधातील कँडल मार्चमध्ये सहभागी झालो.”

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही बिहारमधील मधुबनी येथे भाषणात पहलगाम हल्ल्यावर कठोर भूमिका घेतली. तभारत प्रत्येक दहशतवाद्याला आणि त्यांच्या समर्थकांना शोधून काढेल आणि शिक्षा देईल. आपण त्यांचा पाठलाग पृथ्वीच्या टोकापर्यंत करू. भारताचा आत्मा दहशतवादाने कधीही मोडू शकणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.