विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: पहलकाम हल्ल्यानंतर कठोर पावले उचलत भारताने सिंधू जलकरार रद्द केला. त्याचबरोबर झेलम नदीतून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने पाकिस्तानमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. भारताने मुद्दामहून झेलम नदीचं पाणी पाकिस्तानमध्ये सोडलं आहे. ज्यामुळे पाकिस्तानच्या मुझफ्फराबादमध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली असल्याचा दावा करण्यात आला आहे.
( Water attack on PakistanEmergency situation in Muzaffarabad)
भारताने कोणतीही माहिती न देता पाकिस्तानमध्ये पाणी सोडल्याचा आरोप तेथील अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. भारतानं झेलम नदीचे पाणी सोडण्यापूर्वी पाकिस्तानला कोणतीही कल्पना दिली नाही. त्यामुळे मुझफ्फराबादमधील पाण्याची पातळी अचानक वेगाने वाढत आहे. पाण्याची पातळी वाढल्याने हत्तीयन बाला भागामध्ये स्थानिक प्रशासनाला इमर्जन्सीची घोषणा करावी लागली आहे. मशिदींमधून घोषणा देऊन, तेथील नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोणीही घराच्या बाहेर पडू नका, घरातच राहा असे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
झेलम नदीचं पाणी सोडलं, त्यामुळे मुझफ्फराबादमध्ये आम्हाला इमर्जन्सी लागू करण्याची वेळ आली, असा आरोप पाकिस्तानने केला आहे. तेथील अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे, तसेच नागरिकांनी घराबाहेर पडू नये अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
झेलम नदीचं पाणी उत्तर काश्मीरमध्ये असलेल्या बारामुल्ला जिल्ह्यातून पीओकेमध्ये पोहोचलं. पाणी पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये घुसल्याने तेथील पाण्याच्या पातळीत अचानक मोठी वाढ झाली. त्यामुळे हे पाणी पुढे पाकिस्तानच्या मुजफ्फराबादमधे शिरले. यामुळे पाकिस्तामध्ये आता चांगलाच गोंधळ उडाला आहे. मात्र पाकिस्तान सरकारकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाहीये. अचानक शहरात पाणी घुसल्यामुळे तेथील नागरिकांची चांगलीच धावपळ उडाल्याचं दिसून येत आहे.
