पुरावा मागायला जागा नाही, ऑपरेशन सिंदूरचे कौतुक करत मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

विशेष प्रतिनिधी

मुंबई: भारत सहन करणार नाही, हे भारतीय सैन्याने पुन्हा एकदा दाखवून दिले, अशा शब्दात ऑपरेशन सिंदूरचे कौतुक करताना यावेळी पुरावा मागायला जागा नाही, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला आहे.
( There is no place to ask for evidenceChief Minister takes a dig at the opposition while praising Operation Sindoor)

भारतीय सैन्य दलाने मंगळवारी मध्यरात्रीनंतर पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक करत पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्याचा बदला घेतला. या एअर स्ट्राईकमध्ये 7 शहरांतील दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑपरेशन सिंदूरचे कौतुक केले आहे.
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा बळी गेला. यामध्ये महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा समावेश होता. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट होती. सरकारने या हल्ल्याचा बदला घ्यावा, अशी मागणी नागरिकांकमधून केली जात होती. अखेर पहलगाम हल्ल्याच्या 15 दिवसांनंतर भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमधील दशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करून बदला घेतला. या कारवाईनंतर देशभरातून समाधान व्यक्त केले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या कारवाईवर आनंद व्यक्त केला असून भारतीय सैन्यदल आणि पंतप्रधान मोदींचे अभिनंदन व्यक्त केले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सर्व भारतीयांकरिता अभिमानाचा असा हा दिवस आहे. आमच्यावर झालेला हल्ला भारत सहन करणार नाही. भारत योग्य पद्धतीने बदला घेईल, हे आपण दाखवून दिले आहे. ऑपरेशन सिंदूर हे नाव अधिक बोलके आहे, असे मला वाटते.