भारतीय लष्कराचा करारा प्रहार , पाकिस्तानची रडार सिस्टीम उद्ध्वस्त, HQ-9 हवाई संरक्षण प्रणालीही नष्ट

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या टप्प्याच्या यशस्वी कारवाईनंतर पाकिस्तानकडून सीमेवर उत्तेजक आणि अंधाधुंद गोळीबार सुरू करण्यात आला होता. त्यानंतर भारताने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत ‘ऑपरेशन सिंदूर 2.0’ अंतर्गत जोरदार प्रतिहल्ला केला आणि पाकिस्तानची रडार प्रणाली पूर्णतः उद्ध्वस्त केली. ( Indian Armys strike destroys Pakistans radar system HQ-9 air defense system also destroyed)

भारतीय लष्कराने IAI Harop च्या माध्यमातून पाकिस्तानमधील तीन महत्त्वाच्या ठिकाणी तैनात असलेली HQ-9 हवाई संरक्षण प्रणाली लक्ष्य करत ती नष्ट केली आहे. ही प्रणाली चीनकडून खरेदी केलेली असून तिला FD-2000 असेही म्हणतात. ही जमिनीवरून हवेत मारा करणारी दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्र प्रणाली आहे, जी लढाऊ विमाने, ड्रोन आणि क्रूझ क्षेपणास्त्रांवर प्रहार करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे.

भारताने केलेल्या या सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तानमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. लष्कराच्या सूत्रांनुसार, या कारवाईत लाहोर, कराची, बहावलपूर, रावळपिंडी, गुजरांवाला यासारख्या १२ शहरांमध्ये एकूण ५० ड्रोन हल्ले करण्यात आले आहेत. यामध्ये पाकिस्तानच्या अनेक सामरिक यंत्रणा, दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे आणि रडार युनिट्स नष्ट करण्यात आले आहेत.

पाकिस्तानकडून भारताच्या लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, परंतु भारताच्या S-400 हवाई संरक्षण प्रणालीने पाकिस्तानचे क्षेपणास्त्र हवेतच नष्ट केले. त्याचे अवशेष सीमेवर आढळून आले असून, हे S-400 प्रणालीचे पहिला प्रत्यक्ष युद्धजन्य वापर असल्याचे संरक्षण सूत्रांनी सांगितले. ही प्रणाली रशियाने विकसित केली असून भारताने रणनीतिक सामंजस्यांतर्गत रशियाकडून ती खरेदी केली आहे.

संरक्षण मंत्रालयाने याबाबत अधिकृत पत्रक प्रसिद्ध करत ही माहिती दिली असून, भारतीय सैन्य आता कोणत्याही प्रकारच्या कारवाईसाठी पूर्ण सज्ज असल्याचा संदेश या ऑपरेशनद्वारे दिला आहे.

दरम्यान,b पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे. म्हणजेच ७ मे रोजी पाकिस्तानातील ९ ठिकाणी झालेल्या हवाई हल्ल्यानंतरही कारवाई थांबलेली नाही, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी स्पष्ट केले आहे.