देशावर हल्ला, राजकारण बाजूला ठेवून एकत्र उभे राहा, असदुद्दीन ओवैसी यांचे आवाहन

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : वक्फ कायद्याला आमचा विरोध सुरू राहील. पण तो आमचा देशांतर्गत मुद्दा आहे. पण जेव्हा देशावर बाह्य हल्ला होतो, तेव्हा राजकीय मतभेद बाजूला ठेवून आपण सर्वांनी एकत्र उभे राहणे गरजेचे आहे. देशाचं रक्षण हे सगळ्यांचे सर्वोच्च कर्तव्य आहे, असे मत एआयएमआयएमचे ( AIMIM) अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी व्यक्त केले. (Attack on the countryleave politics aside and stand together appeals Asaduddin Owaisi)

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेला संपूर्ण देशातून पाठिंबा मिळत आहे. खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी राष्ट्रहिताची बाजू उचलून धरत पाकिस्तानला खडसावत देशवासीयांना एकत्र राहण्याचे आवाहन केले. त्यांनी स्पष्ट केलं की, “पहलगाममध्ये २६ हिंदू यात्रेकरूंच्या निर्घृण हत्येची जबाबदारी पाकिस्तानवरच आहे. त्या दहशतवाद्यांनी ठरवून हिंदूंना लक्ष्य केलं. जे ‘कलमा’ म्हणू शकले नाहीत, त्यांना त्यांच्या कुटुंबियांसमोर ठार केलं गेलं. ही मानवतेविरुद्धची घटना आहे आणि भारताला शांत बसणं शक्यच नव्हतं.”

ओवैसी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या अनुच्छेद 51 आणि भारताच्या संविधानातील अनुच्छेद 355 चा दाखला देत सांगितले की, “आपल्याला आत्मसंरक्षणाचा आणि नागरिकांचं रक्षण करण्याचा कायदेशीर अधिकार आहे. त्यामुळे सरकारने घेतलेला निर्णय योग्य असून, मी त्याला पूर्ण पाठिंबा देतो. पाकिस्तानने दहशतवाद्यांना पाठबळ दिलंय, याबद्दल कोणताही संशय नाही.

ओवैसी म्हणाले, “आयपीएल रद्द करणं, विमानतळ बंद करणं ही सगळी सुरक्षा उपाययोजना योग्य आहेत. पण यापुढे देशाची एकजूट महत्त्वाची आहे. सोशल मीडियावर काहीजण काश्मिरी किंवा मुस्लिमांविरोधात द्वेष पसरवत आहेत, त्यांना थांबवलं पाहिजे. आपण कोणत्या पक्षाचे आहोत, हे गौण आहे. आपला देश सुरक्षित राहावा, हेच सर्वोच्च. मी आज जे बोलतोय, ते नेहमीपासून सांगतोय. देशावर हल्ला झाला, तर मी झुकणार नाही. मी भारतीय आहे आणि मला माझ्या देशाबद्दल बोलण्याचा अधिकार आहे.