‘ऑपरेशन सिंदूर’ने जुने हिशोबही चुकते, प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्याचे मास्टरमाइंड दहशतवादी ठार, जैश-ए-मोहम्मदच्या तळांna तडाखा

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली :
भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांवर मोठा लष्करी हल्ला करत ऐतिहासिक यश मिळवलं आहे. या हवाई कारवाईत १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले, ज्यामध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्याच्या कटात सहभागी असलेले प्रमुख दहशतवादीही ठार करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे भारतावर झालेल्या अनेक जुन्या हल्ल्यांचा सूड घेतल्याचे लष्कराने स्पष्ट केलं आहे.

( Operation Sindoor settles old scoresplane hijack and Pulwama attack mastermind terrorists killed Jaish-e-Mohammed bases hit)

डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, “ऑपरेशन सिंदूरमध्ये एकूण ९ दहशतवादी अड्ड्यांवर अचूक हवाई हल्ले करण्यात आले, आणि युसूफ अझहर, अब्दुल मलिक रऊफ, मुदास्सिर अहमद, हाफिज जमील यांसारखे जैश-ए-मोहम्मदचे टॉप कमांडर ठार झाले आहेत.” या दहशतवाद्यांमध्ये IC-814 कंधार हायजॅकचा मास्टरमाइंड युसूफ अझहर होता, जो मसूद अझहरचा मेहुणा होता आणि जैशसाठी शस्त्र प्रशिक्षणाचा प्रमुख होता.

मुरीदकेचा अड्डा, जो लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख अड्डा होता, आणि जिथून अजमल कसाबसारखे दहशतवादी घडवले गेले, त्याच्यावरही जबरदस्त कारवाई करण्यात आली. यामुळे पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांना मोठा धक्का बसला आहे.

भारतीय हवाई दलाने बहावलपूरमधील मौलाना मसूद अझहरच्या घरावरही बुधवारी पहाटे १.३० वाजता हल्ला केला, ज्यामध्ये त्याच्या कुटुंबातील १४ दहशतवादी मारले गेले आहेत. यामध्ये त्याच्या बहिणीचा संपूर्ण परिवार, नातवंडं, आणि सहकारी यांचा समावेश आहे. मसूद अझहर त्यावेळी घरी नसल्याने बचावला, पण हल्ल्यानंतर त्याचा निवेदनातील भावनिक उद्गार होता — “मी सुद्धा मारला गेलो असतो, तर बरं झालं असतं!”

जैश-ए-मोहम्मदने देखील या हल्ल्यांची कबुली दिली असून, त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, “मौलाना कशफ यांचं संपूर्ण कुटुंब, मौलाना मसूद अझहर यांच्या बहिणीसह, मुक्ती अब्दुल रऊफ यांचे नातवंडं आणि इतर सदस्य या हल्ल्यात ठार झाले आहेत.”

ऑपरेशन सिंदूरच्या उद्दिष्टांबद्दल बोलताना लेफ्टनंट जनरल घई यांनी सांगितले कीहा हल्ला केवळ सूड नव्हे, तर दहशतवादी नेटवर्कची मुळं उखडून फेकण्याचा संकल्प आहे. आम्ही त्यांच्या मुख्य प्रशिक्षण केंद्रांवर, तळांवर, कमांड नेटवर्कवर अचूक हल्ले केले आहेत. त्यांचं लॉजिस्टिक आणि इंटेलिजन्स बेस उद्ध्वस्त करण्यात आला आहे.”

या कारवाईनंतर पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली असून, काही शहरांमध्ये हवाई तळ आणि दहशतवादी प्रशिक्षण केंद्र बंद ठेवण्यात आले आहेत. पाकिस्तान सरकारकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली, तरी अमेरिकेने या कारवाईनंतर शांतता राखण्याचे आवाहन केले आहे, तर इस्रायल आणि फ्रान्सने भारताच्या या कारवाईचे समर्थन केलं आहे.

ऑपरेशन सिंदूरमुळे भारताने फक्त पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला नाही, तर जुने हिशोबही फेडले. यामुळे पाकिस्तानमध्ये दहशतवादी तळांवर भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा, आणि ISI यांच्या पायाभूत रचनेला तडा गेला आहे. भारतीय लष्कराची ही कारवाई भविष्यातील दहशतवादी कारवायांना रोखण्याच्या दृष्टीने निर्णायक ठरणार आहे.