बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी नरेंद्र मोदींची गळाभेट घेतली असती, अमित शहा यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

विशेष प्रतिनिधी

नांदेड : ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निर्णय घेतला की, सर्व पक्षाचे खासदार वेगवेगळ्या देशात जाऊन पाकिस्तानचा खरा चेहरा उघड करतील. मात्र शिवसेना ठाकरे गटाच्या प्रमुखांनी म्हटले कोणाची वरात निघाली आहे. आज बाळासाहेब ठाकरे असते, तर त्यांनी ऑपरेशन सिंदूरनंतर नरेंद्र मोदींची गळाभेट घेतली असती, असा हल्लाबोल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर चढविला.
( If Balasaheb Thackeray was therehe would have hugged Narendra Modi Amit Shah attacks Uddhav Thackeray)

नांदेडचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम यांनी
अमित शहा यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी बोलताना अमित शहा म्हणाले, 22 तारखेला पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी धर्म विचारून निर्दोष भारतीयांना त्यांच्या कुटुंबासमोर मारलं होतं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाटणा येथे बोलताना दहशतवाद्यांना शोधून त्यांना मातीत मिसळू, असं म्हटलं आहे. कारण 15 वर्षांपूर्वी काँग्रेसचं सरकार होतं आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार आहे.
अमित शहा म्हणाले की, पाकिस्तानने पुलवामावर हल्ला केला आणि आपण एअर स्ट्राईक केला. पाकिस्तानने पहलगामवर हल्ला केला आणि आपण ऑपरेशन सिंदूर केलं. यानंतर आपण पूर्ण जगाला संदेश दिला आहे की, भारताला डिवचू नका, नाहीतर परिणाम वाईट होतील. 7 मे रोजी अवघ्या बावीस मिनिटांमध्ये दहशतवाद्यांचे 9 ठिकाण उद्ध्वस्त केले होते. त्यांच्या मुख्यालयाला उडवण्याचे काम भारतीय सैन्याने केलं. मोदींनी या ऑपरेशनला सिंदूर असं नाव दिलं. आमच्या मुलीच्या कपाळावरील कुंकू स्वस्त नाही हे त्यांनी दाखवून दिलं. त्यानंतर आठ तारखेला पाकिस्तानने ड्रोन हल्ला केला, पण आपण त्यांचा हल्ला परतून लावला. 9 मे रोजी आपण पाकिस्तानवर हल्ला केला, या हल्ल्यामध्ये त्यांचे एअर बेस उध्वस्त केले.