पाकिस्तानचा भोंगा’ म्हणत संजय राऊतांवर भाजपचा व्यंगचित्रातून निशाणा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर भारतीय जनता पक्षाच्या वतीने उद्धव जोरदार पलटवार करण्यात आला आहे. व्यंग चित्राच्या माध्यमातून संजय राऊत यांना थेट संबंध पाकिस्तानशी जोडला आहे. ऑपरेशन सिंदूर अपयशी ठरल्याबद्दल राऊत यांनी शंका उपस्थित केली होती. पाकिस्तान देखील तसाच दावा करत आहे. त्यावरुन भाजपच्या वतीने राऊत यांचा उल्लेख ‘पाकिस्तानचा भोंगा’ असा केला आहे.( BJP targets Sanjay Raut in cartoon calling himPakistans bhonga’)

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारतीय सैनिकांच्या वतीने ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले होते. मात्र हे ऑपरेशन सिंदूर अपयशी ठरले असल्याचा दावा पाकिस्तानच्या वतीने करण्यात येत आहे. त्यातच उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील ऑपरेशन सिंदूर अपयशी ठरले असल्याबाबत शंका उपस्थित केल्या होत्या. त्यांच्या या वक्तव्याला भारतीय जनता पक्षाच्या वतीने देखील पलटवार करण्यात आला आहे. संजय राऊत यांचा उल्लेख पाकिस्तानचा भोंगा असा करत भाजपने एका व्यंगचित्र प्रसिद्ध केले आहे.

या व्यंगचित्रामध्ये भारत आणि पाकिस्तानचा प्रतिकात्मक नकाशा दाखवण्यात आला आहे. यामध्ये पाकिस्तानचा आयएसआय एजंट असलेला एक हात आणि त्यावर बसलेला पोपट दाखवण्यात आला आहे. या पोपटाचा चेहरा संजय राऊत यांच्या चेहऱ्याचा दाखवण्यात आला आहे. तसेच पाकिस्तानचा भोंगा ऑपरेशन सिंदूर अपयशी ठरले असे म्हणत असल्याचे देखील या पोस्टमध्ये दाखवण्यात आले आहे. व्यंगचित्रांमध्ये या माध्यमातून नाव न घेता भाजपने संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

इतकेच नाही तर भारतीय जनता पक्षाच्या वतीने या पोस्टला OperationSindoor आणि ShameOnUBT असे टॅग देखील जोडले आहेत. त्यामुळे भाजपच्या या पलटवाराला आता ठाकरे गट किंवा संजय राऊत काय उत्तर देणार? हे पहावे लागेल.