विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : महात्मा गांधींच्या भूमीतून दहशतवाद्यांना आता मोकळं रान मिळणार नाही. भारत दुसरा गाल पुढे करणार नाही, उलट जशास तसे प्रत्युत्तर देईल,” असा स्पष्ट इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार शशी थरूर यांनी पाकिस्तानला दिला आहे. ( India will not turn the other cheek Shashi Tharoor warns Pakistan to give a befitting reply to terrorists)
भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर निर्णायक कारवाई केली. या पार्श्वभूमीवर भारताने आपल्या भूमिकेला जागतिक पातळीवर पाठिंबा मिळविण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ विविध देशांत पाठवली आहेत. पनामामध्ये गेलेल्या शिष्टमंडळाचे नेतृत्व थरूर करत असून त्यांनी तेथील राष्ट्रपती जोस राऊल मुलिनो यांची भेट घेतली.
या भेटीत थरूर यांनी भारताची भूमिका विशद करताना म्हटले, “महात्मा गांधींनी अहिंसेचा मार्ग दाखवला, पण त्यांनी नेहमी सांगितले की अन्यायाविरुद्ध उभे राहणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. आम्ही शांतीप्रिय आहोत, पण दुर्बल नाही. भारताचे संयमाचे धोरण आमच्या क्षमतेचा कमकुवतपणा समजून पाकिस्तान सारख्या देशांनी वारंवार दहशतवाद्यांमार्फत भारताला दुखावले. पण आता आम्ही बदललो आहोत.”
ते पुढे म्हणाले, “दहशतवादी आमच्या देशात येतात, निष्पाप लोकांचा जीव घेतात, आणि पळून जातात. त्यामागे धार्मिक आणि राजकीय उद्दिष्टे असतात. पण कोणतंही स्वाभिमानी राष्ट्र हे कधीही सहन करणार नाही. यापुढे भारत शांत राहणार नाही. आता आमची भूमिका स्पष्ट आहे – जर कुणी आपल्यावर हल्ला केला, तर आपण त्याला दुप्पट प्रत्युत्तर देऊ.”
थरूर यांनी पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांवर आंतरराष्ट्रीय पातळीवर दबाव आणण्याचेही आवाहन केले. “भारत केवळ स्वतःसाठी नव्हे, तर जागतिक शांततेसाठीही लढतो आहे,” असे त्यांनी सांगितले.
थरूर यांनी पनामाच्या संसदेत देखील भारतातील दहशतवादाच्या घटनांचा आढावा घेत ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाचे महत्त्व स्पष्ट करत पनामासह लॅटिन अमेरिकेतील इतर देशांना भारताच्या दहशतवादविरोधी भूमिकेला पाठिंबा देण्याचे आवाहन केले.
