विशेष प्रतिनिधी
नाशिक : शिवसेना ठाकरे गटात मोठा भूकंप होण्याचे संकेत भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. ठाकरे गट सध्या जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे. या पक्षात पुढील 8 दिवसांत मोठा भूकंप होईल. त्यानंतर त्या पक्षात कोण राहणार व कोण राहणार नाही हे स्पष्ट होईल, असा दावा भाजप नेते आणि जलसंपदा मंत्री महाजन यांनी केला आहे. ( Another big earthquake in Shiv Sena Thackeray group in eight days claims Girish Mahajan)
गिरीश महाजन नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, संजय राऊत नाशिकमध्ये येऊन संघटनात्मक बैठक घेऊन गेले. पण त्यांच्या बोलण्यामुळे स्वतः उद्धव ठाकरेही बेजार झाले असतील. पण आता तो विषय आऊट ऑफ कंट्रोल झाला आहे. संजय राऊत एकटेच ठाकरे गट संपवण्यासाठी पुरेसे आहेत. त्याला इतरांची गरज लागणार नाही. त्यांची बडबड व विचार काय आहे ते नंतर पाहू. तूर्त निवडणुकीला सामोरे या. त्यानंतर आपण भेटू.
नाशिक शहर व जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपमध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत. पुढे काय होते ते आठवड्याभरात स्पष्ट होईल. 8 दिवस थांबा. पुढे काय होते ते पाहा. सगळे मोठ प्रवेश असतील. त्यात काही पक्ष अक्षरशः नेस्तनाबुत होतील, असा दावा महाजन यांनी केला.
नाशिकच्या पालकमंत्रीपदावर बोलताना महाजन म्हणाले, नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या मुद्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मी त्यावर काही वेगळे बोलणार नाही. मी कुंभमेळा मंत्री आहे. ही एक मोठी जबाबदारी आहे. त्यासंदर्भात कामही जोरात सुरू आहे. कालच्या बैठकीसाठी केवळ मंत्री महोदयांना निमंत्रण होते. आमदार, खासदार यांना नव्हते. काही आमदार मुख्यमंत्री आल्यामुळे या कार्यक्रमाला आले. या बैठकीला 13 च्या 13 आखाड्यांचे महंत आले. असे पहिल्यांदाच घडले.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदारांसह उठाव करून शिवसेना पक्ष फोडला होता. सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेलाच अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता आहे. त्यांनतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचा दारुण पराभव झाला. तेव्हापासून ठाकरे गटाला गळती लागली आहे. अनेक नेते पक्ष सोडून जात आहेत.
