विशेष प्रतिनिधी
नाशिक : “ठाकरे गट लवकरच रिकामा उतरलेला दिसेल” हा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा स्फोटक दावा आता खरा ठरत असल्याचे संकेत नाशिकमधून मिळत आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांतील अपेक्षाभंग, संघटनेतील बदलांबाबतचा नाराजीचा सूर आणि स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांची नाराजी यामुळे ठाकरे गटामधील अंतर्गत विसंवाद चव्हाट्यावर आला आहे.
( Girish Mahajans warning will come true Growing wave of discontent in Thackeray group shadow of earthquake in Nashik)
काल ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ही भेट राजकीय दृष्टीने महत्त्वाची मानली जात असून, पक्षांतराची नांदी ठरण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, खासदार संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर असतानाच ही भेट घडल्याने ठाकरे गटासाठी ही मोठी डोकेदुखी ठरत आहे.
माध्यमांशी बोलताना बडगुजर यांनी स्पष्टपणे सांगितले की, “मी संजय राऊत यांच्यावर नाराज नाही, पण संघटनेत जे फेरबदल झाले, त्यात आम्हाला विश्वासात घेतले नाही. हेच खटकत आहे. आम्ही पक्षासाठी प्रचंड मेहनत घेतली. प्रतिकूल परिस्थितीत देखील आम्ही खासदार निवडून आणला. पण आमच्या योगदानाची दखल घेतली जात नाही.”
बडगुजर पुढे म्हणाले, “महानगरप्रमुख विलास शिंदे देखील नाराज आहेत. त्यांनी पक्षासाठी काम केलं, नेतृत्व दिलं. त्यांच्या इच्छेनुसार मला योग्य स्थान मिळावं, असं त्यांनी वरिष्ठांना सांगितलं. पण काहीच झालं नाही. त्यामुळे माझी नाराजी कोणावर नाही, मी स्वतःवर नाराज आहे की एवढं करूनही योग्य न्याय मिळाला नाही.”
राजाभाऊ वाझे यांच्या उमेदवारीच्या वेळी देखील सर्व विरोध झुगारून प्रचारात सक्रीय सहभाग घेतला होता असे सांगून बडगुजर म्हणाले की, “आम्ही एकसंघ राहून पक्ष मजबूत केला, पण आता आमच्या भावना दुर्लक्षित होत आहेत. संघटनेतील फेरबदलांमुळे नाराजीचा सूर वाढतोय.”
विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासून उद्धव ठाकरे गटाला घरघर लागली आहे. अनेक नेते पक्ष सोडून जात आहेत.
