खोट्या प्रचाराचा पराभव! जनतेने काँग्रेसचा मुखवटा फाडला, चंद्रशेखर बावनकुळे यांचा घणाघात

विशेष प्रतिनिधी

नागपूर : “‘मोदी संविधान बदलणार’ अशा भीतीदायक आणि निराधार प्रचाराचा काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत फायदा घेतला. मात्र विधानसभेसाठीही हेच पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न त्यांनी केला, पण यावेळी जनतेने त्यांचा खोटारडेपणा ओळखला आणि त्यांना धडा शिकवला,” असा घणाघात महसूल मंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. ( Defeat of false propaganda People have exposed the CongressChandrashekhar Bawankules attack)

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लेख लिहून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप केला आहे. यावर बोलताना बावनकुळे म्हणाले, “राहुल गांधी यांनी निवडणूक प्रक्रियेवर केलेले आरोप म्हणजे त्यांच्या पराभवातून आलेले नैराश्य आहे. छोट्याच कालावधीत जनतेला काँग्रेसच्या बेईमानीची आणि दिशाभूल करणाऱ्या प्रचाराची जाणीव झाली. महाराष्ट्रातील जनतेने भाजप महायुतीच्या पारदर्शक व विकासाभिमुख अजेंडाला मतदान केले.”

बावनकुळे यांनी आकडेवारी देत स्पष्ट केले की, “विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व महाविकास आघाडीला एकूण ३३ लाख मते कमी मिळाली, तर भाजप महायुतीचे मताधिक्य ६९ लाखांनी वाढले. हेच दाखवतं की लोकांनी चुकीच्या प्रचाराचा बदला दिला आणि विकासाचा मार्ग निवडला.”

महानगरपालिका निवडणुकीकडे लक्ष वेधत बावनकुळे म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आम्ही जनहिताचे काम करत आहोत. महानगरपालिका निवडणुकीत आम्ही ५५ टक्क्यांहून अधिक मतदान घेऊन सत्ता मिळवू.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अठरा पगड जातींसाठी जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतल्याने सर्व समाजांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे, असेही बावनकुळे म्हणाले. काँग्रेस समाजकल्याण निधीच्या बाबतीत समाजात संभ्रम निर्माण करत आहे, असा आरोप करत त्यांनी स्पष्ट केले की, “सर्व समाजांसाठी राखीव निधी उपलब्ध आहे. काँग्रेस मुद्दाम चुकीची माहिती पसरवत आहे.”

नितेश राणे यांच्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादावर विचारले असता, बावनकुळे म्हणाले की, “राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. कोणावर अन्याय झाला असल्यास, तो न्याय देण्याचे काम मुख्यमंत्र्यांच्याच माध्यमातून होईल. काहींच्या भावना दुखावल्या असतील, तर त्याची योग्य दखल घेतली जाईल.”