विशेष प्रतिनिधी
पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या 26 व्या वर्धापनदिन सोहळ्यातच पक्षात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. मला आता या पदातून मुक्त करा आणि नव्या चेहऱ्यांना संधी द्या, असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. शरद पवारांचे नातू आणि आमदार रोहित पवार यांच्याशी सुरू असलेल्या सुप्त संघर्षातून वाफल्यातून त्यांनी हे वक्तव्य केले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
( Jayant Patils resignation from the post of state president is imminent conflict with Rohit Pawar leads to failure!)
वर्धापन दिनाच्या सोहळ्यातपक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षप्रमुख शरद पवार यांच्याकडे मागणी केली. ते म्हणाले ,“शरद पवारांनी मला 7 वर्षे प्रदेशाध्यक्षपदाची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पण मला आता या पदातून मुक्त करा आणि नव्या चेहऱ्यांना संधी द्या. शेवटी पक्ष शरद पवार यांचा आहे, त्यांनी यावर योग्य निर्णय घ्यावा. आपल्याला बरेच पुढे जायचे आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून जयंत पाटील हे पक्षात नाराज असल्याच्या चर्चा आहेत. ते भारतीय जनता पक्षात जाणार अशी चर्चाही सुरू होती. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटात काही आलबेल नसल्याचे त्यांच्या वक्तव्यातून दिसत असल्याचे म्हटले जात आहे.
अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दोन गट पडले. मात्र, याचा फायदा घेत आमदार रोहित पवार यांनी राजकारणातील हालचाली वाढवायला सुरुवात केली आहे. राज्यभराचा दौरा करून आमदार रोहित पवार यांनी आपली ताकद दाखवली. लोकसभा निवडणुकीत देखील आमदार रोहित पवार यांनी जोरदार प्रचार करून अनेक उमेदवारांच्या विजयात आपला देखील वाट असल्याचे सिद्ध केले आहे. याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांचे पक्षातील महत्त्व वाढत आहे. त्यातच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार रोहित पवार यांच्यामध्ये संघर्ष दिसून आला. गेल्या वर्षी झालेल्या पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमातही हा संघर्ष जाणवला होता.
त्याच कार्यक्रमात पक्षाच्या जयंत पाटील म्हणाले होते की काही लोक माझ्या अध्यक्षपदासंबंधी महिने मोजत आहेत. मात्र मला केवळ चारच महिने द्या. राज्यात सरकार आणू. त्यानंतर मी स्वतःच ‘नमस्कार’ करेन. माझ्याबद्दल काही तक्रारी असतील तर तर थेट शरद पवार यांच्या कानात सांगा. त्यांनी दोन कानशिलात दिल्या तर त्या घेऊ. उगाच जाहीर वाच्यता करू नका.”
जयंत पाटील यांच्या या विधानांचा संदर्भ रोहित पवार यांच्या आधीच्या वक्तव्यांशी होता. लोकसभा निवडणूक निकालानंतर रोहित पवार यांच्याविषयी ‘संघर्षातही न डगमगणाऱ्या युवा नेतृत्वाचा उदय’ असे जाहिरात स्वरुपातील लेख प्रसिद्ध केले होते. जयंत पाटील यांच्यातर्फे ‘विजयाचा सेनापती’ अशा मथळ्याच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या होत्या. एकूणच, ही विसंगती राज्यात चर्चेची ठरली असताना रोहित पवार यांनी, विजयाचा कोणी एक सेनापती नाही, हे यश शरद पवार आणि राज्यभरातील कार्यकर्त्यांचे सामूहिक असल्याचे जाहीरपणे सांगितले होते.
मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाचा दारुण पराभव झाला. त्यानंतर या दोन नेत्यांमधील संघर्ष आणखी वाढला होता.
