मी मुख्यमंत्री आहे तोपर्यंत कोणीही गैरकृत्य करणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ठाम विश्वास

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राजकारणात टिकून राहण्यासाठी कधी कधी काही तडजोडी कराव्या लागतात. पण मी मुख्यमंत्री आहे तोपर्यंत कोणीही गैरकृत्य करणार नाही याची मी ग्वाही देतो, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

( As long as I am the Chief Minister no one will commit any wrongdoing says Chief Minister Devendra Fadnavis)

इंडियन एक्सप्रेस अड्डा’ या विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासन, भ्रष्टाचार, राजकीय तडजोड, हिंदुत्व, विरोधकांची स्थिती, आणि मुंबईच्या बदलत्या चेहऱ्यावर स्पष्ट आणि सडेतोड मत मांडले. ‘इंडियन एक्सप्रेस’चे कार्यकारी संचालक अनंत गोयंका आणि राष्ट्रीय संपादक वंदिता मिश्रा यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

भ्रष्टाचाराच्या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले, भ्रष्टाचार ही कायमची समस्या आहे, आणि तिचा नायनाट केवळ पारदर्शकता आणि डिजिटल तंत्रज्ञानाद्वारेच होऊ शकतो. भ्रष्टाचार रोखण्यासाठी केवळ पारदर्शक आणि डिजिटल यंत्रणा उपयोगी ठरतात.

सरकारमध्ये यापूर्वी भ्रष्टाचाराचे आरोप असलेले मंत्री का आहेत, या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिलं, “2019 मध्ये बहुमत असूनही मला मुख्यमंत्री होऊ दिलं गेलं नाही. त्यामुळे आम्हाला राजकीय तडजोड करावी लागली. पण मी ग्वाही देतो, माझ्या मंत्रिमंडळात कोणी चुकीचं करणार नाही.

राजकीय तडजोडीबद्दल ते म्हणाले, “राजकारणात नेहमीच संधीसाधूपणा होता आणि आहे. 1978 साली शरद पवारांनी सरकार स्थापन करताना शिवसेना फोडली, 1992 मध्येही असंच झालं. हे चक्र आहे.”

2014 साली पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर आणि आता यातील फरक सांगताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुरुवातीला सांगितले की, “2014 साली मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घेतली तेव्हा मी काम करत होतो, पण पूर्ण आत्मविश्वास नव्हता. आता मात्र मी शासनाची परिणामकारकता सिद्ध केली आहे. 2014-19 मध्ये काय उणिवा राहिल्या, हे मला माहीत आहे. मी माझ्या उणिवा ओळखल्या आहेत आणि त्या सुधारण्यावर भर दिला आहे. म्हणूनच आज मी अधिक आत्मविश्वासाने काम करतो. आता माझे लक्ष हे केवळ पायाभूत सुविधांवर नाही, तर संस्थात्मक सुधारणा आणि एंड-टू-एंड डिजिटायझेशन वर केंद्रित आहे. आता कुणालाही सरकारी कार्यालयात जायची गरज नाही. व्हाट्सअप (WhatsApp) वरून किंवा क्यू आर (QR) कोडने सेवा मिळतील. Meta सोबत MoU झालं आहे. पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानच एकमेव पर्याय आहे. मुख्यमंत्रीपदाची धुरा स्वीकारल्यावर 100 दिवसांचं आव्हान प्रत्येक खात्याला दिलं होतं. आता 150 दिवसांचं दुसरं आव्हान सुरू आहे. आमचं उद्दिष्ट म्हणजे सर्व सेवा एका प्लॅटफॉर्मवर आणणं आहे.

मुंबई पावसामुळे ठप्प होण्याच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री म्हणाले, “डिझाईनच्या मर्यादा आणि हवामानबदल दोन्ही जबाबदार आहेत. पण भ्रष्टाचार देखील नाकारता येणार नाही. सुधारणा सुरू आहेत.

लव्ह जिहाद’ आणि ‘वोट जिहाद’ यावर बोलताना ते म्हणाले, “पूर्वी मला वाटायचं की हे अतिशयोक्ती आहे, पण हजारो घटना पाहिल्यानंतर मी यावर अभ्यास केला. हे एक डिझाइन आहे हे लक्षात आलं. खोट्या नावाने लग्नं, धर्मपरिवर्तन हे देशासाठी घातक आहे. माझी भूमिका कोणत्याही धर्मविरोधात नाही, पण जर खोट्या ओळखीवर लग्न होत असतील आणि कटकारस्थानातून हे घडत असेल तर ते रोखायला हवं.”

विरोधक लढत असतील तर आम्ही त्यांचे स्वागत करू, पण ते आहेत कुठे? असा सवाल करत मुख्यमंत्री म्हणाले, ‘भारत जोडो’ आघाडी ही अशा संघटनांनी भरलेली होती ज्या पूर्वी डाव्या विचारसरणीच्या किंवा शहरी माओवादी होत्या. म्हणून मी त्यांना अराजकवादी म्हणतो.

कुणाल कामराच्या प्रकरणावर ते म्हणाले, “अशा लोकांकडे दुर्लक्ष करणं अधिक शहाणपणाचं असतं, पण आमचे आणि शिवसेनेचे काही नेते भावनिक असल्यामुळे प्रतिक्रिया येतात.

मुंबई पावसामुळे ठप्प होण्यामागचे कारण सांगताना मुख्यमंत्री म्हणाले, “आता पर्जन्यमान आणि त्याची तीव्रता वाढली आहे. पावसाआधीच पाणी पडू लागलं आणि आपली यंत्रणा त्यासाठी तयार नव्हती. ही रचना, हवामानबदल आणि काही प्रमाणात भ्रष्टाचाराची एकत्रित समस्या आहे. सुधारणा सुरू आहेत, पण अजून काम बाकी आहे.”