विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : इराण-इस्त्राईल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीत भारतासाठी दिलासादायक पाऊल उचलण्यात आले आहे. इराणने भारतासाठी अपवादात्मक निर्णय घेत, आपले हवाई क्षेत्र खुलं केल्याने ”ऑपरेशन सिंधू’ यशस्वी; इराणकडून भारतासाठी हवाई मार्ग खुला, १,००० भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा’च्या दुसऱ्या टप्प्यास गती मिळाली असून, सुमारे १,००० अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या भारतात पुनरागमनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
या विद्यार्थ्यांपैकी बहुसंख्य विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी इराणमध्ये वास्तव्यास होते. संघर्षामुळे इराणने आपले हवाई क्षेत्र बंद केल्यामुळे विद्यार्थ्यांना भारतात आणणे कठीण झाले होते. मात्र भारत सरकारच्या प्रयत्नांनंतर, इराणने भारतासाठी विशेष परवानगी देत चार्टर्ड फ्लाइट्सना परवानगी दिली आहे. त्यामुळे मशहद आणि तेहरानमधून थेट भारतात येण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
यापूर्वी, पहिल्या टप्प्यात ११० विद्यार्थ्यांना रस्ते मार्गाने आर्मेनियाच्या येरवॉन शहरात हलवून तेथून विमानाद्वारे भारतात आणण्यात आले होते. आता उर्वरित सुमारे ९०० विद्यार्थ्यांना हवाई मार्गाने परत आणण्यासाठी ‘ऑपरेशन सिंधू’च्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, “भारतीय नागरिकांची सुरक्षा हे आमचं सर्वोच्च प्राधान्य आहे. स्थानिक यंत्रणांशी सतत समन्वय साधत परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.” ही मोहीम भारतीय वायुदल आणि नागरी उड्डाण मंत्रालय यांच्या संयुक्त प्रयत्नातून राबवली जात आहे.
मशहद, कूम आणि तेहरान या संघर्षग्रस्त भागांतील विद्यार्थ्यांना सध्या तुलनेत सुरक्षित भागांमध्ये हलवण्यात आले आहे. त्यानंतर तेथून त्यांना भारतात परत आणले जात आहे. भारतीय दूतावास आणि स्थानिक प्रशासनाकडून सातत्याने विद्यार्थ्यांशी संपर्क ठेवण्यात येत असून, प्रत्येक टप्प्यावर त्यांची काळजी घेतली जात आहे.
