पश्चिम बंगालमध्ये ममतांची हुकूमशाही! डॉक्टरला भेट देणाऱ्या केंद्रीय मंत्र्याला पोलिसांनी केली अटक

विशेष प्रतिनिधी
कोलकाता : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या प्रशासनावर प्रश्न विचारणाऱ्या डॉक्टरला भेट देण्यासाठी गेलेल्याच भाजप प्रदेशाध्यक्ष व केंद्रीय मंत्री सुकांत मजुमदार यांना अटक करण्यात आल्याने पश्चिम बंगालमधील राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकारामुळे केंद्र आणि राज्य यांच्यातील संघर्षाचे स्वरूप अधिकच तीव्र झाले असून, भाजपने या कारवाईला “राज्य प्रायोजित गुंडशाही” ठरवत तीव्र निषेध नोंदवला आहे.

ही घटना कोलकात्यातील हरिश मुखर्जी रोडवर घडली. लंडनस्थित डॉक्टर राजतशुभ्र बंधोपाध्याय यांच्या घरी सुकांत मजुमदार भेटीसाठी गेले होते. पोलिसांनी आधी त्यांना अडवून सांगितले की डॉक्टर घरी नाहीत. मात्र काही वेळात डॉक्टर स्वतः घराबाहेर आले आणि दोघांची भेट झाली. त्यानंतर अचानक पोलिसांनी हस्तक्षेप करून दोघांनाही ताब्यात घेतले.

डॉ. बंधोपाध्याय हे ब्रिटिश नागरिक असून मूळ बंगालचे आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी ऑक्सफर्डमधील एका व्याख्यानात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना थेट विचारले होते की, “तुमच्या कारकिर्दीत बंगालमध्ये कोणती मोठी औद्योगिक गुंतवणूक झाली आहे का?” या प्रश्नानंतर मोठा गोंधळ उडाला होता. त्या घटनेमुळे डॉक्टर चर्चेत आले होते.

अटक झाल्यानंतर डॉक्टर बंधोपाध्याय यांनी पत्रकारांशी बोलताना संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, “मी एका केंद्रीय मंत्र्याला भेटलो म्हणून मला गुन्हेगारासारखी वागणूक मिळाली. ही लोकशाहीची विटंबना आहे. पोलिसांनी अटक का केली, याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल.”

पोलिस व्हॅनमध्ये बसताना सुकांत मजुमदार म्हणाले, “आम्ही काय गुन्हा केला? एका डॉक्टरला भेट देणं गुन्हा आहे का? कोणतीही नोटीस न देता आम्हाला अटक करण्यात आली. ही राज्यघटनेच्या मुल्यांची पायमल्ली आहे.”

भाजपचे नेते सौरव सिकदर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं, “ही कारवाई म्हणजे राज्य सरकारच्या दबावतंत्राचं उत्तम उदाहरण आहे. पोलिस यंत्रणांचा वापर करून विरोधकांना दडपण्याचा प्रयत्न केला जातोय.”

दुसरीकडे, तृणमूल काँग्रेसने कारवाईचे समर्थन करत भाजपवर पलटवार केला. पक्षाचे प्रवक्ते कुणाल घोष म्हणाले, “भाजप पश्चिम बंगालमध्ये जाणीवपूर्वक अस्थिरता माजवतोय. डॉक्टर बंधोपाध्याय यांची भूमिका वादग्रस्त आहे. पोलिसांनी कायद्यानुसारच कारवाई केली आहे.”

या संपूर्ण प्रकरणामुळे पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण आणखीच तापले असून, भाजपने “लोकशाहीची गळचेपी” म्हणून ह्या घटनेविरोधात राज्यभर आंदोलन करण्याचे संकेत दिले आहेत. सोशल मीडियावरूनही ममता सरकारवर टीकेची झोड उठली आहे.