विशेष प्रतिनिधी
नाशिक : वादग्रस्त वक्तव्यांमुळे अडचणीत आलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मखलाशी करत आम्हालाही वाटते की अजितदादानी मुख्यमंत्री व्हावे असे वक्तव्य केले आहे. ( Manikrao Kokates Cryptic RemarkWe too feel Ajit Dada should become Chief Minister!”)
मुख्यमंत्रीपद हा आकड्यांचा खेळ आहे आणि त्या आकड्यांच्या गणितात प्रत्येक पक्ष आपापलं काम करत असतो. आम्हालाही वाटतं की अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावं, त्यात चुकीचं काय आहे? असा सवाल कोकाटे यांनी केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोकाटे हे त्याच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत. शेतकऱ्यांना भिकारी म्हटल्याने त्यांच्यावर चांगलेच टीकेचे मोहोळ उठले होते. अजित पवारांनीही त्यांना सुनावले होते. आता पुन्हा त्यांनी महायुतीच्या समीकरणात वादग्रस्त विधान केले आहे. कोकाटे म्हणाले की, “इच्छा असण्यात वाईट काय? मुख्यमंत्रीपद हा आकड्यांचा खेळ आहे आणि त्या आकड्यांच्या गणितात प्रत्येक पक्ष आपापलं काम करत असतो. आम्हालाही वाटतं की अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावं, त्यात चुकीचं काय आहे?”असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
यापूर्वीही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अजित पवार यांच्या मुख्यमंत्री पदावरून वक्तव्ये केली होती. पुढील आषाढी एकादशीला पंढरपूरच्या पांडुरंगाची शासकीय महापूजा अजित पवार यांनी सपत्नीक मुख्यमंत्री म्हणून करावी, अशी प्रार्थना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी विठ्ठल चरणी केली असल्याचे सांगितले होते. त्यामुळे अमोल मिटकरी म्हणाले होते की, आम्ही पांडुरंगाला एकच साकडे घातले की यावर्षी पांडुरंगाच्या मनात नसेल. पण, पुढील आषाढी एकादशीला शासकीय महापूजा ही राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री म्हणून सपत्नीक करावी, अशी इच्छा व्यक्त केली होती. यानंतर राज्याचे कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते माणिकराव कोकाटे यांनी देखील अशीच इच्छा व्यक्त केली आहे.
वास्तविक महायुतीमध्ये असलेल्या भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यामध्ये अजित पवार गटाला सर्वात कमी जागा आहेत. मात्र तरीही राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सातत्याने अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत वक्तव्ये येत आहेत.
