विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : केंद्र सरकारच्या ‘पीएम श्री शाळा’ योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात ‘सीएम श्री आदर्श शाळा योजना’ राबवली जाणार असून, या अंतर्गत सुमारे ५ हजार शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यात येणार आहेत. तसेच १० हजार शाळांमध्ये “एक वर्ग – आदर्श वर्ग” म्हणून तयार केला जाईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी कला आणि क्रीडा यांना विशेष महत्त्व देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. ( CM Shri Adarsh School Schemewill be implemented in the state on the lines of PM Shri School Schemesays Education Minister Dada Bhuse)
डॉ. रफीक झकेरिया कॅम्पसमध्ये शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागातर्फे आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळेत भुसे बोलत होते. यावेळी शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, राज्य प्रकल्प संचालक संजय यादव, शैक्षणिक संशोधन परिषदेचे संचालक राहुल रेखावार, शिक्षण संचालक महेश पालकर आदी उपस्थित होते.
दहा हजार शिक्षकांच्या भरतीची प्रक्रिया सध्या प्रगतीपथावर असून त्यामुळे राज्यात कुशल शिक्षक मनुष्यबळ उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास संपूर्ण देशात शिकवण्यात येणार आहे. यासाठी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याशी चर्चा करून त्यांनी तात्काळ मंजुरी दिली आहे, असे ते म्हणाले.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आल्याचे सांगत, सीबीएसई अभ्यासक्रमातील शाळांमध्ये मराठी भाषा बंधनकारक करण्यात आली आहे. राष्ट्रगीतानंतर राज्यगीत गायनही सन्मानाने करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी ‘प्रवेशोत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आल्याचे नमूद करून भुसे म्हणाले, “पालकांना गुणवत्तापूर्ण शिक्षण हवे आहे. त्यामुळे शिक्षक, पालक, प्रशासन सगळ्यांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांच्या घडवणुकीसाठी काम करावे.”
गावपातळीवरील १५ समित्यांचे ४ प्रमुख समित्यांमध्ये रूपांतर करण्यात आले असून, त्यांचे सक्षमीकरण व लोकसहभाग वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. शाळांमध्ये स्वच्छ पाणी, स्वच्छता, इमारती, क्रीडांगण, प्रयोगशाळा, वाचनालय या आवश्यक भौतिक सुविधा टप्प्याटप्याने उभारल्या जातील, असेही भुसे यांनी स्पष्ट केले.
वारे गुरूजींच्या शाळेला जगातील टॉप १० शाळांमध्ये स्थान मिळाल्याचा गौरव करत, राज्यात ध्येयवादी शिक्षकांचे कार्य पुढे नेले पाहिजे. अशा शिक्षकांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या कार्यपद्धती गावोगावी पोहोचवण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
प्रत्येक जिल्ह्यात एक क्रीडा प्रबोधिनीची शाळा सुरु करण्याचा मानस व्यक्त करत नाविन्यपूर्ण उपक्रमांचा समावेश करत राज्यातील शाळा अधिक प्रगत व गुणवत्तापूर्ण बनवाव्यात, यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन दादा भुसे यांनी केले.
