विशेष प्रतिनिधी
मुंबई : राजकारणातील सुसंस्कृततेच्या गप्पा मारल्या जात असताना महविकास आघाडीच्या नेत्यांकडून वैफल्यातून पातळी सोडून टीका केली जात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी राणे कुटुंबावर टीका करताना मंत्री असलेला नेपाळी वॉचमन सारखा दिसणारा पोरगा अशी खालच्या पातळीवरील भाषा वापरली आहे. (A boy who looks like a Nepali watchmanBhaskar Jadhav dropped the level while criticizing the Rane family)
भास्कर जाधव हे सध्या ठाकरे गटात नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यांनी आपली नाराजी अनेक वेळा बोलून दाखवली आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांच्यासमोर आपली निष्ठा दाखवताना त्यांनी आक्षेपार्ह भाषा वापरली आहे. भास्कर जाधव म्हणाले की, नारायण राणेंना आत्ताच राज ठाकरे यांच्यावर प्रेम आले असेल तर आठ दिवसापूर्वी मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी नारायण राणेंना त्यांची जागा दाखवून दिली आहे. नारायण राणे यांनी राज ठाकरे यांच्या बद्दल किंवा त्यांच्या मुलाने त्यांच्याबद्दल जे वक्तव्य केले, त्याबद्दल प्रकाश महाजन यांनी सांगितलं आहे की, नारायण राणे हा एहसान फरामोश माणूस आहे. त्यामुळे मला असे वाटते की, त्यांनी दिलेले उत्तर पुरेसे आहे.
नारायण राणे यांनी इतरांची काळजी करण्यापेक्षा तुम्ही तुमचा पक्ष का सोडला? तुम्ही तुमचा पक्ष काढला आणि एक वर्षात आपला पक्ष का सोडला? त्याचे उत्तर महाराष्ट्राला द्या. तुम्ही काँग्रेस पक्ष का सोडला? त्याचे उत्तर महाराष्ट्राला द्या. तुम्ही भाजपाच्या चिपळूणच्या मेळाव्यात रवींद्र चव्हाण यांना इशारा का दिला? त्याचे उत्तर द्या. खरे तर नारायण राणे आणि राणे फॅमिलीची चोच नेहमी नरकातच बुडालेली असते. परवाच्या दिवशी मंत्री असलेला नेपाळी वॉचमन सारखा दिसणारा पोरगा त्याने कोणत्या भाषेत माझ्यावर टीका केली? हेच मंत्री भारतीय जनता पक्षाच्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आहेत. त्यामुळे ज्यांची चोच ही कायम नरकातच बुडालेली असते, अशा लोकांबद्दल पुन्हा मला विचारू नका, असेही ते म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांना छळले होते, त्रासही दिला होता, पक्षाबाहेर जायला यांनीच प्रवृत्त केले होते. त्याची यांना जाणीव नाही वाटतं? आणि आता का म्हणून लाळ ओकताहेत, असा सवाल नारायण राणेंनी उपस्थित केला आहे. आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी नारायण राणे यांना उत्तर दिले आहे. राणे यांनी म्हटले होते की , उद्धव ठाकरे सन्माननीय राज जी ठाकरे यांना भाऊबंदकी या नात्याने परत या असे म्हणून प्रयत्न करीत आहेत. मला आठवते याच उद्धव ठाकरेंनी राज जी ठाकरे यांना छळले होते, त्रासही दिला होता, पक्षाबाहेर जायला यांनीच प्रवृत्त केले होते. त्याची यांना जाणीव नाही वाटतं ? आणि आता का म्हणून लाळ ओकताहेत. सन्माननीय राज जी, नारायण राणे, गणेश नाईक, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना वाढीसाठी आयुष्य दिले त्यांना बाहेरचा रस्ता दाखवून दिला. माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला सत्तेत बसविले याने सत्ता घालविली. शिवसेनेच्या अधोगतीला पूर्ण जबाबदार उद्धव ठाकरे आहे. मराठी माणसाने व हिंदूंनी याला घरी बसविले. गेलेले परत मिळवण्याची धमक व क्षमता उद्धव ठाकरे मध्ये नाही ! जो बूंद से गई वो हौद से नहीं आती.
