विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही विद्यार्थ्यांची शैक्षणिक हत्या करणारी सेना आहे. ही गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणारी सेना आहे. आणि आता या शैक्षणिक संहारावर ‘विजयी मेळावा’ साजरा केला जाणार आहे, हा नालायकपणा आहे,” अशा संतप्त शब्दांत ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनसे आणि ठाकरे गटावर घणाघात केला आहे.
( MNS is the army that kills students Will the victory rally over educational destruction be won Gunaratna Sadavartes allegation)
राज्य सरकारने ‘हिंदी सक्ती’ संदर्भातील शासन निर्णय मागे घेतल्यानंतर ५ जुलै रोजी ठाकरे गट आणि मनसेकडून मुंबईत एकत्रित विजयी मोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर सदावर्तेंनी दोन्ही पक्षांच्या राजकारणावर जोरदार टीका केली.
ते म्हणाले, “हा लढा ‘मराठी विरुद्ध हिंदी’ असा नाही, तर ‘गरीब विरुद्ध श्रीमंत’ असा आहे. समाजातील कष्टकरी, भटके-विमुक्त, ओबीसी, शेतकरी, वंजारी समाज या सगळ्यांची ही चळवळ आहे. शिक्षणाचा अधिकार श्रीमंतांच्या सोयीसाठी नाकारणं म्हणजे संविधानाच्या मूलभूत तत्त्वांवर गदा आणणं आहे.”
सदावर्तेंनी नवीन शैक्षणिक धोरणातील ‘क्रेडिट’ प्रणालीवरून गंभीर चिंता व्यक्त केली. “श्रीमंत विद्यार्थ्यांना १२ क्रेडिट्स मिळतात, तर गरीब विद्यार्थ्यांना फक्त ७. हा अन्याय आहे. क्रेडिट आधारित शिक्षण पद्धतीत गरीबांचा प्रवेश अधिक अडथळाग्रस्त होतो. हा असमतोल निर्माण करणाऱ्या धोरणामागे राज ठाकरे आणि त्यांची विचारसरणी कारणीभूत आहे.”
“राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ज्या शाळांमध्ये शिकले, तिथे तीन भाषा शिकवल्या जातात. मग सामान्य शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांवर ही सक्ती का? सरकारने हा निर्णय लोकदबावामुळे मागे घेतला, पण त्यामागे लोकांचे नैतिक बळ होते. या निर्णयावर आनंद साजरा करणं म्हणजे शैक्षणिक संहारावर फुलं उधळणं आहे.”
“५ जुलै रोजी जे काही विजयी मेळाव्याच्या नावाखाली होणार आहे, तो दिवस महाराष्ट्राच्या शैक्षणिक इतिहासात ‘काळा दिवस’ म्हणून नोंदला जाईल,” असं त्यांनी ठणकावून सांगितलं. “राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं राजकारण गल्ली पातळीवरचं आणि दळभद्री आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य उध्वस्त करून हे नेते स्वतःचे राजकीय हेतू साध्य करत आहेत.”
सदावर्ते म्हणाले, “राज ठाकरे यांच्या विचारांची ‘वळवळ’ फार काळ टिकणार नाही. त्यांच्या विषारी राजकारणाला आता आवर घातला पाहिजे.”
