जय गुजरात घोषणा देऊन एकनाथ शिंदे यांनी उठवून घेतले टीकेचे मोहोळ

विशेष प्रतिनिधी

पुणे : राज्यात मराठी- हिंदी वाद सुरु असताना आणि शिवसेना ठाकरे गट आणि मनसेकडून भाषेच्या मुद्यावर सरकारवर टीका केली जात असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून एका कार्यक्रमात जय गुजरात अशी घोषणा देण्यात आली होती. यावरून आता वाद होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांनी टीकेचे मोहोळ उठवून घेतले अशी टीका होत आहे. (Eknath Shinde drew criticism by raising the slogan Jai Gujarat)

केंद्रीय मंत्री अमित शाह आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी जयराज स्पोर्ट्स् आणि कन्व्हेंशन सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमात शिंदे यांनी भाषण केले. भाषण संपताना शिंदे यांनी धन्यवाद, जय महाराष्ट्र म्हटले आणि निघत असताना खाली वाचून त्यांनी पुन्हा जय गुजरात असा नारा दिला.
गुजराती समाजाकडून पुण्यातील कोंढवा भागात हे सेंटर उभारण्यात आले आहे. शिंदे यांनी अमित शाह यांच्या उपस्थितीत हा नारा दिला आहे. अमित शाह यांच्यासाठी शिंदे यांनी एक शेर ऐकविला. ”आपके बुलंद इरादोंसे तो चट्टाने भी डगमगाती है, दुश्मन क्या चीज है, तुफान भी अपना रुख बदल देता है, आपके आने से यहाँ की हवा का रुख बदल जाता है, आपके आनेसे हर शख्स आदब से झुक जाता है”, असा हा शेर शिंदे यांनी ऐकवला.

यावर एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, मला त्यात काही आश्चर्य वाटत नाही. कारण महाराष्ट्र द्रोही निर्णय घेऊन महाराष्ट्राच्या अस्मिता दिल्लीश्वरांच्या पायथ्याशी वाहिल्यानंतर त्यांना मुख्यमंत्रीपदाचे बक्षीस मिळाले आहे. त्यामुळे ते बक्षीस मिळाल्याने आपण सगळ्यात अतिउत्तम लाचार कसा? हे दाखवण्याची स्पर्धा सुरू झालेली आहे. ज्या पद्धतीने अजित पवारांनी सर्व ताब्यात घेतलेले आहे आणि एका अर्थाने शिंदे हे बऱ्यापैकी वेगळे झालेले आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा प्रवाहात येण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्यांना हे सगळं बोलणे गरजेचे आहे.