युतीसाठी राज ठाकरे भीक घालत नसल्याने संजय राऊत पत्रकारांवरच चिडले , त्यांनाच जाऊन विचारा म्हणाले !

विशेष प्रतिनिधी

मुंबई : आम्ही मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी जो हात पुढे केलेला आहे. तो कायम असणार आहे, असे पालुपद लावून शिवसेना ठाकरे गट राज ठाकरेंसमोर अगतिक झालाय. पण राज ठाकरे त्याला भीक घालायला तयार नाहीत. उलट युती संदर्भात कोणीही बोलू नये, असे आदेश त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना दिलेले आहेत. यामुळे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत चिडून युतीबाबत तुम्ही तुम्ही राज ठाकरे यांनाच विचारा असे म्हणाले. ( Raj Thackeray was not begging for an allianceSanjay Raut got angry at the journalists and said go and ask him !)

राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून त्रिभाषा धोरण आणि पर्यायाने हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाविरोधात ठाकरे बंधू 20 वर्षांनी एकाच व्यासपीठावर एकत्र आले. मात्र त्यामुळे जणू ठाकरे गट आणि मनसेची युती झालीच म्हणून अनेक जण नाचू लागले. मात्र राज ठाकरेंनी आता युती संदर्भात संभ्रमात टाकले आहे. राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्या युती संदर्भात कोणीही बोलू नये, असे आदेश त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना दिलेले आहेत. कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी युती संदर्भात बोलताना आधी मला विचारावे असे आदेश राज ठाकरे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. यामुळे मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तसेच पदाधिकाऱ्यांमध्ये युतीच्या संदर्भात मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. ज्या प्रकारे उद्धव ठाकरे यांच्याकडून युतीबाबत सकारात्मकता दिसली ती राज ठाकरेंच्या भाषणातुन दिसली नाही, अशा देखील चर्चा राजकिय वर्तुळात सुरु आहेत.

याच अनुषंगाने युतीबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले, जनतेच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून एक भूमिका स्पष्ट व्हावी, अशी लोकांची अपेक्षा जरी असली तरी योग्य वेळी योग्य गोष्टी घडत असतात. महाराष्ट्राची जनता या एका क्षणाची गेल्या 20 वर्षांपासून वाट पाहत होती. योग्य वेळी योग्य गोष्टी घडत असतात .

आमच्याकडून आम्ही सातत्याने मराठीसाठी महाराष्ट्रासाठी जो हात पुढे केलेला आहे. तो कायम असणार आहे, असे सांगत युतीसाठी आपली अगतिकताही संजय राऊत यांनी बोलावून दाखविली. पुन्हा एकदा मराठीच्या मुद्यावर राज ठाकरे यांना आवाहन करताना राऊत म्हणाले, मराठी माणसाच्या मनातल्या भावना किंवा जो संताप आहे त्या संतापाला वाट करून देण्याचे काम सुद्धा आम्ही करत आहे. जो आदर आणि प्रेम ठाकरे कुटुंबावर आणि मराठी माणसाच्या एकजूटी विषयी आहे. त्या संदर्भात सुद्धा आमची भूमिका सकारात्मक आहे. तीच भूमिका राज ठाकरे आणि मनसे पक्षाची आहे, याविषयी माझ्या मनात शंका नाही. दोन्ही बाजूचे तळागाळातील कार्यकर्ते गेल्या काही दिवसापासून एकत्र काम करत आहेत, एकत्र आंदोलन करत आहेत. आनंदाच्या क्षणी एकत्र येत आहेत, मिळून काम करत आहेत. महाराष्ट्रात हे चित्र कालपर्यंत फार दुर्मिळ होतं, आज जर ते दिसत असेल तर त्यात मिठाचा खडा टाकण्याचं काम कोणी करू नये.