विशेष प्रतिनिधी
पुणे : हळूच ओव्हरटेक करून राँग साईडने जाण्याचा प्रयत्न करणारा माणूस सापडला तर तो मुलगा किंवा व्यक्ती कितीही मोठ्या बापाची असली तरी त्याला टायरमध्ये घेऊन झोडायला सांगणार आहे, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. ( Ajit Pawar has given a big blow to the unruly Baramatikars, he will tell them to hit him with a tire!)
बारामतीमधील सावित्री हॉस्पिटलच्या उद्घाटनानंतर अजित पवारांनी बारामतीकरांशी थेट दमच दिला. बारामतीकरता, इंदापूरकरता, महाराष्ट्राकरिता ज्या ज्या गोष्टी करता येतील त्या गोष्टी महायुती सरकार करत आहे. पण आता यापुढे बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही. काही जण चुका करत आहेत, रस्त्यावर कचरा टाकत आहेत. जनावरे चरायला सोडत आहेत. मी त्यांना कृपा करून सांगतो, आता ती जनावर कोंडवड्यात घातली तर ठीक, नाही ऐकले तर त्यांना बाजार दाखवतो. आता जे मालक आहेत त्यांना निर्वाणीचा इशारा देतो, ऐकले तर ठीक नाही ऐकले तर मालकांवर केसेस होतील, ज्यांची गाढव आहेत, जनावर आहेत, ज्यांच्या गाई इकडे-तिकडे फिरत असतात. तुम्ही तुमच्या दारात बांधायचे ते बांधा, काय खायला प्यायला घालायचे ते घाला, बारामती जी चांगली करतो ती काय सगळ्यांना मोकळी फिरण्याकरता नाही, अशी समज अजित पवारांकडून देण्यात आली आहे.
कधी कधी मोटरसायकलवाले इकडे तिकडे बघतात, हळूच ओव्हरटेक करत राँग साईडने जाण्याचा प्रयत्न करतात. असा माणूस सापडला तर तो मुलगा किंवा व्यक्ती कितीही मोठ्या बापाची असली तरी त्याला टायरमध्ये घेऊन असा झोडायला सांगणार आहे. म्हणजे त्याला दहा पिढ्या आठवल्या पाहिजे. अजिबात नियम कोणीही तोडू नका, मग तो अजित पवार असो किंवा अजित पवाराचा कोणी नातेवाईक असेल. सर्वांना नियम सारखा आहे. मी जे करतो ते बारामतीकरांसाठी, सर्वांसाठी करतो. मी अनेक ठिकाणी झाड लावली आहेत, तिथे कोणी पण येत आहे, जनावरं खात आहेत. पण, तसे चालणार नाही. जिथे माणसांना बसायला केले आहे, तिथे एकजण मोटरसायकल उभी करून निवांत मांडी घालून लोकांसोबत गप्पा मारतोय. गाडी वळवली आणि पोलिसांना सांगितले की, याची गाडी ताब्यात घे आणि याला चांगला टायरमध्ये घाल, मग तो म्हणतोय दादा चुकलं, पण आता असे चालणार नाही, असा इशाराच अजित पवारांकडून देण्यात आला आहे.
