विशेष प्रतिनिधी
मुंबई :”बाळासाहेब ठाकरे सहकाऱ्यांना ‘सवंगडी’ समजायचे, पण काहीजण त्यांना ‘घरगडी’ समजू लागले आणि तिथेच गाडी फसली,” अशा थेट शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. (He Mistook Colleagues for Servantsand Thats Where It All Fell ApartEknath Shindes Sharp Attack on Uddhav Thackeray)
आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन सेनेसोबत युतीची अधिकृत घोषणा करताना एकनाथ शिंदे बोलत होते. बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा असणारी शिवसेना आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा चालवणारे दोघेही लढवय्ये कार्यकर्ते आता एकत्र आले आहेत. शिवसेना आणि रिपब्लिकन सेना दोन्हीही रस्त्यावर अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या सेना आहेत. एकीकडे बाळासाहेबांचा वारसा, दुसरीकडे बाबासाहेबांचं रक्त ही युती कार्यकर्त्यांच्या ताकदीवर आधारित आहे. पक्षाचा पाया हा कार्यकर्ताच असतो. कार्यकर्ता मजबूत असतो, तेव्हाच पक्ष मजबूत होतो. आणि जर कधी त्याला थोडी मदत लागली, तर नेत्याने त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे.
शिंदे यांनी आनंदराज आंबेडकर यांचे कौतुक करताना सांगितले की, त्यांनाही वारसा मोठा आहे. परदेशात जाऊन शिक्षण घेणारे ते भारतीय होते. साधी राहणी उच्च विचारसरणी हे त्यांनी पाळलं. सत्तेत गेल्यावर जनतेची सेवा करता येते. सत्ता जनतेसाठी राबावायची असते. शिवशक्ती आणि भीमशक्ती ही कार्यकर्त्यांची फौज असलेली सेना आहे. तुमची सेना रिपब्लिकन सेना आणि आमची सेना शिवसेना आहे. तुमच्याही पक्षात आणि आमच्याही पक्षात कोणी मालक किंवा कोणी नोकर नाही. सर्वजण कार्यकर्ते आहेत. मुख्यमंत्री असताना सीएम म्हणजे कॉमन मॅन म्हणून काम केलं. आता देवेंद्र फडणवीस हे सीएम आहेत आणि मी डीसीएस आहे म्हणजेडे डिकेटेड टू कॉमन मॅन आहे. शेवटी सर्वसामान्य माणूस आणि कार्यकर्ता हीच आपली सामाजिक बांधिलकी आहे. त्यामुळे तळागाळातील माणसाशी नाळ तुटता कामा नये हे नेहमी पाळण्याचे पथ्य आपण केलं. आनंदराज आंबेडकर यांना बाबासाहेबांचे रक्ताच्या वारसा आहे. बाबासाहेबांच्या संविधानामुळे तुमचा एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्री झालेला आहे!
