विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकारितेतील ढासळत्या मूल्यांवर ताशेरे ओढले आहेत. इगतपुरी येथे झालेल्या मनसेच्या निवडक पदाधिकाऱ्यांच्या शिबिरानंतर काही माध्यमांनी चुकीचे वृत्त प्रसिद्ध केल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “मी न बोललेले शब्द माझ्या तोंडात घालू नका,” अशा शब्दांत त्यांनी माध्यमांना जाब विचारला आहे. ( Raj Thackerays anger at journalismDont put words in my mouth that I didnt say..’)
राज ठाकरे म्हणाले की, “१४ आणि १५ जुलै रोजी इगतपुरी येथे झालेल्या शिबिरादरम्यान पत्रकारांशी माझा अनौपचारिक संवाद झाला. त्या गप्पांदरम्यान ५ जुलैच्या विजयी मेळाव्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. मी स्पष्टपणे सांगितले की, तो मेळावा राजकीय नव्हता, तर मराठी माणसाच्या विजयाचा होता. यावर युतीबाबत प्रश्न विचारला असता, मी गमतीने उत्तर दिलं की ‘युतीच्या चर्चा तुम्हालाच करायच्या आहेत का आता?’
परंतु यानंतर काही इंग्रजी व मराठी वृत्तपत्रांनी, तसेच काही निवडक माध्यमांनी, मी न म्हणलेले विधान माझ्या तोंडात घालून बातम्या प्रसिद्ध केल्या की, ‘युतीचा निर्णय महापालिका निवडणुकांच्या आधीची परिस्थिती पाहून घेतला जाईल.’ यावरून राज ठाकरे संतप्त झाले असून त्यांनी विचारलं, “ही कुठली नवीन पत्रकारिता जन्माला आली आहे?”
ते पुढे म्हणाले, “अनौपचारिक गप्पा या अनौपचारिकच ठेवाव्यात, त्यातून बातम्या तयार करताना जे बोललोच नाही ते सांगणं म्हणजे पत्रकारितेचा गालबोट लावणं नाही का? कोणाच्या सांगण्यावरून पत्रकारिता करायची ही नवीन पद्धत काही पत्रकारांनी स्वीकारलेली आहे. असं आम्हाला समजत नाहीये असं समजू नका!”
राज ठाकरे यांनी टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीवर विशेषतः नाराजी व्यक्त केली आणि विचारले, “इतकं मोठं आणि जुने दैनिक, तरीही शहानिशा न करता अशा बातम्या प्रकाशित करतात? सोशल मिडियावरचा धिंगाणा पत्रकारितेत येऊ नये, हीच अपेक्षा आहे.”
आपल्या पत्रकारिता प्रवासाची आठवण करून देताना त्यांनी सांगितले की, “१९८४ पासून माझा पत्रकारितेशी थेट संबंध आहे. आमच्या घरातच नियतकालिकं, साप्ताहिकं जन्माला आली. मी स्वतः व्यंगचित्रकार म्हणून ‘मार्मिक’, ‘लोकप्रभा’, ‘आवाज’, ‘लोकसत्ता’ ते ‘सामना’ अशा अनेक वर्तमानपत्रांमधून कार्य केलं आहे. त्यामुळे चांगली पत्रकारिता काय असते, हे मला नीट माहिती आहे.”
माझ्याकडून कोणतंही राजकीय विधान अपेक्षित असेल तर मी अधिकृत पत्रकार परिषद घेईन. कोणत्याही अनौपचारिक संवादातून तो अर्थ काढू नये, असेही राज ठाकरे म्हणाले.
